Wednesday, 31 May 2017

जाणत्या राजाचे दूरगामी व्यवस्थापन !

छत्रपती शिवरायांचे जीवनच एवढे भव्य आहे की, त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक दिवसावर एक ग्रंथ निर्माण व्हावा. आज्ञापत्रातून त्यांच्या पर्यावरणविषयक भूमिकेचा अभ्यास करता हा राजा काळाच्या किती पुढे होता याची महती पटते. शिवरायांनी प्रत्येक किल्ल्यांवर केलेले काटेकोर जल व्यवस्थापन, स्वच्छतेबाबत त्यांचा निकोप दृष्टिकोन तसेच पर्यावरणाविषयी त्याचे अत्यंत महत्त्वाचे विचार हे पाहता ख-या अर्थाने हा राजा पर्यावरणाचा प्रणेता होता. आज संपूर्ण जग जागतिक तापमानवाढीने त्रस्त आहे. या पार्श्वभूमीवर, शिवरायांच्या विचारात, त्यांच्या धोरणात आपल्याला नवी दिशा मिळेल.

शिवरायांचे जल व्यवस्थापन


किल्ल्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने सर्वात प्रथम पाण्याचे महत्त्व अत्यंत महत्त्वाचे व अनन्यसाधारण आहे. त्यात सहय़ाद्रीत व एकंदर भारतात चार महिने पाऊस पडतो. त्यामुळे प्रत्येक किल्ल्यावर पाण्याची साठवणूक शिवराय काटेकोरपणे करत असत. शिवकाळात विजेचा शोध लागला नव्हता. त्यामुळे विद्युतपंपाने पाणी खेळवणे, हे त्या काळी शक्य नव्हते. मात्र त्याही परिस्थितीत शिवनिर्मीत प्रत्येक किल्ल्यावर वर्षभर पुरेल व प्रसंगी गडावर जर हल्ला झाला तर आणीबाणीच्या काळातही आवश्यक तो पाणीसाठी कसा राहील, याची योग्य ती काळजी शिवरायांनी घेतलेली आहे. त्याचे मुख्य कारण त्याकाळी जलाभेद्य खडकांचे थर आणि पाझरणारे खडक यांच्या साहाय्याने पाणीसाठा करता येऊ शकतो, हे तत्कालीन पाथरवटांच्या (खडक फोडणारी जमात) लक्षात आले होते. त्यामुळे अशा हरहुन्नरी लोकांकडून शिवरायांनी किल्ल्यामध्येच खाणी अथवा हौद किंवा दगडांच्या उतरणीवर खोल खड्डे निर्माण करून पाणी सतत पाझरत राहील, याची व्यवस्था केली होती. त्याचबरोबर अशा जलाभेद्य खडकांची जर मुबलकता आढळली तर त्यातले मधले खडक अलगद काढून किंवा त्यांना पाणी पाझरत राहील इतके तासून तलाव तयार केले व पाण्याची वर्षभर मुबलकता कशी राहील, याकडे विशेष लक्ष दिले. रायगडावरील गंगासागर तलाव, कोळींब तलाव, सज्जनगडावरील सोनाळे तलाव, प्रतापगडावरील रहाटाचे तळे, भवानी तलाव ही त्याची काही उदाहरणे आहेत. त्याचबरोबर सपाट व नागरी वस्त्यांमध्ये शिवरायांनी विहिरी, तलाव, पाणवठे खोदून घेतले होते. रायगडावरील शिलालेखात रायगड बांधणा-या हिरोजी इंदुलकर यांनी.. ‘वापी, कुप, तडाग’ असा केलेला उल्लेख फार महत्त्वाचा आहे. राजधानी रायगडाच्या दृष्टीने पाणीसाठा गंगासागर, हत्ती तलाव, हिरकणी तलाव, बामण तलाव, काळा हौद, कुशावर्त तलाव, चांभार टाके, हनुमान टाके अशा विपूल पाणी साठवण्याच्या जागा वर्षभर पुरेसा पाणी पुरवठय़ाच्या दृष्टीने शिवरायांनी गड बांधतानाच करवून घेतल्या होत्या. इतर किल्ल्यांवरही पाण्याची मुबलकता लोकांना उपलब्ध करून दिली होती. मात्र त्याचे नियोजन अगदी काटेकोर होते. शिवरायांचे वन व्यवस्थापन वनस्पती आणि माणूस यांचे एकमेकांशी असणारे नाते शिवरायांनी ओळखले होते. शिवरायांच्या संघर्षमय जीवनातदेखील पर्यावरणाचे संतूलन ठेवणारी वनश्री त्यांच्या नजरेआड झाली नाही. त्या काळची वनराई ही भरमसाठ असूनही त्याचा ऱ्हास शिवरायांनी कधीच होऊ दिला नाही. प्रत्येक गडावर व गड परिसरात शिवरायांनी आंबा, वड, नारळ, शिसव, बाभूळ, ऐन, यांची लागवड केली होती. आरमारासाठी साग व शिसवी झाडे वापरली जात असत. फळ, फळांवरासाठी आंबा, चिकू, फणस इत्यादी झाडे इतकेच नव्हे तर संदेश वहनासाठी काळा धूर व पांढरा धूर सोडणारी झाडेही शिवरायांनी खास लावली होती. त्यांचा उपयोग त्याप्रमाणे करूनही घेतला होता.


आज्ञापत्रात शिवराय निसर्गसंवर्धनाबाबत किती जागरूक होते, याचा प्रत्यय येतो. ‘रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये’ हे शिवरायाचे तत्त्व होते. अगदी गरज पडल्यास शेतक-यास योग्य तो मोबदला देऊन झाडे खरेदी करावीत. रयतेस तोशीस पडता कामा नये. आंबा, फणस ही झाडे लेकरांसाठी वाढवली. मात्र सैनिकांनी बळजबरीने तोडल्यास त्यांच्या दु:खाला पारावार उरत नाही, अशी त्यांची भावना होती. इतके पर्यावरण व रयतेच्या बाबतीतले स्पष्ट विचार पाहून हा राजा जनतेचा किती विचार करत होता, हे लक्षात येते. शिवरायांचे समकालीन संत तुकाराम यांचा ‘वृक्षवली आम्हा सोयरी वनचरे’ हा अभंग शिवरायांनी केवळ घेतला नाही, तर प्रत्यक्ष आचरला. गड, परिसराच्या मोकळय़ा जागा, बागायती जागा, डोंगरपायथ्याचे अनेक भूखंड त्यांनी ओलिताखाली आणून जाणीवपूर्वक झाडे वाढवली.

स्वच्छतेचे अनोखे व्यवस्थापन 


 छत्रपती शिवरायांनी सतराव्या शतकात आपल्या गडकोटात शौचकुपांची व्यवस्था केली होती. आजच्या काळातही आवर्जुन जाऊन बघावी अशी मलमूत्र विसर्जनाची अनोखी व्यवस्था आपल्याला थक्क करून टाकते. शिवरायांच्या पर्यावरण व ग्रामस्वच्छतेचा दृष्टिकोन किती निकोप होता, याचे हे उत्तम उदाहरण ठरावे. आजच्या काळात आपण निर्मल ग्राम स्वच्छता अभियान राबवून त्यावर कोटय़वधी रुपये खर्च करतो; परंतु १७व्या शतकात अशा प्रकारची योजना शिवरायांनी कुठलाही गाजावाजा न करता भ्रष्टाचारमुक्त वातावरणात राबवली होती, हे विशेष! आजही प्रतापगडाच्या पूर्वेकडील बुरुजात, रायगड, राजगड, पुरंदर येथील ब-याच सुस्थितीत असलेली शौचकुपे पाहाता येतात. पहा-यावरील सैनिकांनी नैसर्गिक विधीसाठी कुठेही लांब व पहारा सोडून जाऊ नये, यासाठीही ही व्यवस्था. इतकेच नव्हे तर मलमूत्र खोल तटबंदी बाहेर दरीत पडण्याची व्यवस्था पाहून शिवराय काळाच्या किती पुढे होते, याची साक्ष पटते. गडावरच्या वस्तीमध्येही व गडावर कुठेही, कचरा साठला तर तो जाळून त्याची राख जमिनीत टाकून त्यावर भाज्या पिकवण्यात याव्यात, गड राबता व स्वच्छ ठेवावा, विहिरी, पाणवठे, सदैव स्वच्छ ठेवावेत, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट, शोषखड्डय़ाची व्यवस्था, कंपोस्ट खतासाठी, सोनखतासाठी सदैव आग्रही दृष्टिकोन पाहता शिवरायांच्या स्वच्छताविषयक दृष्टिकोनाची प्रचिती येते. आज हगणदारीमुक्त गाव व हगणदारीमुक्त समाज करण्यासाठी जे शासनाकडून प्रयत्न होत आहेत. पैसा खर्च होत आहे, मात्र अजूनही अपेक्षित यश येत नसताना शिवरायांनी संपूर्ण भष्टाचारमुक्त योजनेतून ही संकल्पना १७व्या शतकात यशस्वीपणे राबवली, ते पाहता शिवराय जलसंवर्धन, वनसंवर्धन व ग्रामस्वच्छता योजनेचे ख-या अर्थाने प्रणेते होते, यात शंका नाही. अशा जाणत्या राजाला मानाचा मुजरा.
 

संकलन : ऋषिकेश सुदर्शन शिंदे...


 अधिक माहितीसाठी खालील Apps Download करा  

स्वराज्य माझ्या राजांच Android App Download करा

शिवसह्याद्री Android App Download करा

स्वराज्य माझ्या राजांच Facebook Page Like करा

श्रीशिवराज्याभिषेक

रायगड सजले , भारतात समाज शासनबद्ध झाला आणि मराठ्यांच्या राज्यकारभारात नवे पर्व सुरू झाले- राजधानी रायरीवर शिवाजी महाराजांचा राज्...