Thursday, 1 June 2017

राजमाता जिजाऊ आणि आजचा महाराष्ट्र....


महाराष्ट्राच्या मातीत आणि या मातीतल्या माणसांच्या मनात आणि आचरणात ज्यानं स्वाभिमान आणि स्वातंत्र्य पेरलं, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात ते स्वाभिमान आणि स्वातंत्र्याच बीज ज्या आईने पेरलं, ती आई म्हणजे जिजाऊसाहेब.

 त्यांना फक्त शिवबांच्याच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राच्या आई म्हणाव लागेल, म्हणूनच राष्ट्रमाता आणि राजमाता हे नाव जिजाऊ साहेबांना अगदी शोभते. काही शतकांनंतर सुद्धा छत्रपतींचे विचार किती सद्य परिस्थितीला साजेशे वाटतात. सामाजिक समता, मानवी हक्क, स्त्रियांचा हक्क, सर्वांसाठी समान न्याय आणि अनेक मानवी मुल्यांचा आदर करणारे विचार, जे छत्रपतींच्या आचरणात होते, आपण म्हणू शकतो या आईनेच त्यांना दिले; त्यासाठीचे वातावरण आणि संस्कार जिजाऊ साहेबांनी शिवरायांना दिले. हा सह्याद्रीचा राजा, सहयाद्री सारखाच कणखर आणि अंगाई सारखा दयाळू व मायाळू या आईच्या पदराखालीच झाला. पुढे छत्रपतींच बाळ, बाळराजे, धर्मवीर संभाजी महाराज ही याच कुशीत आणि संस्कारात वाढले.

महाराष्ट्राला छत्रपती आणि त्या छत्रपतींना विचार आणि आचार आणि आपल्या भाषेत Vision देणार्‍या आऊ जिजाऊचा आज जन्मदिवस. या वेळेस २०१७ ची जिजाऊ जयंती म्हणजे संक्रमण स्थितीतील महाराष्ट्राची जिजाऊ जयंती. आज महाराष्ट्र म्हणजे जाती–पातींनी ग्रासलेल राज्य, सामाजिक आणि आर्थिक दरीने ग्रासलेल राज्य, एक दूरदृष्टी नसलेल आणि ती कधी भविष्यात येईल की नाही अशा शंके मधे असलेल राज्य. शेतकरी अजुन ही आत्महत्या करतो आहे, आता तर ते लोन कापसाच्या पिका पासून द्राक्षाच्या पिकापर्यंत आलय. आता, जयंती आणि आनंद–उत्सवाच्या दिवशी असा विषय बोलू नये असे वाटते; पण मग आपलेच डोळे आपण आऊ जिजाऊची आठवण काढली की आपोआप उघडतात. ज्या मातीसाठी आणि मराठी मुलखसाठी जीणे आपल बाळ दिल आणि आपलही आयुष्य त्या मूलखाच्या कल्याणासाठी घालवल अशा आईला जन्मदिनी असो की कधी ही असो हे सगळ पाहून या पेक्षा वेगळ काय वाटेल.
पूर्ण प्रगतीच्या आणि जागतीकरणाच्या उंबरठ्यावर असणारी शहरे आणि त्याच जागतीकरणा पासून कोसो दूर असणारी गावे, खूप अंतर वाढलय–सामाजिक आणि आर्थिक स्थितीत. कुणी जागतिकीकरणामुळे फुलासारख बहरूण निघलाय तर कुणी होरपळून! या आर्थिक प्रक्रियेत हे होणे साहजिक आहे आणि हा एक प्रकारचा नियमच. पण जिथे कशा ही नियमाला न जुमानता लोक–कल्याणकारी सहकार चळवळ उभी राहिली, स्त्री शिक्षणाचे धडे गिरवले गेले, जिथे अखिल मराठा–ब्राम्हण–दलित समाज जाती पातीचा विचार न करता संयुक्त महाराष्ट्रा साठी उभा राहीला. आणि येथेच जातिभेद निर्मुलनासाठी साठी शिंदे, पाटील, जोशी आणि आंबेडकर एकच ध्येय घेऊन खांद्याला खांदा लाऊन लढले, अशा या आमच्या महाराष्ट्राला नजरच लागली म्हणाव लागेल. आर्थिक आणि सामाजिक प्रगतीचे इतके कणखर अनुभव असलेला महाराष्ट्र आज केविलवणा चेहरा घेउन दिल्लीत आणि जगा समोर उभा आहे का?

आज खूप महत्व आलय दारीद्र्य निर्मूलनाला, म्हणजे या पूर्वी कधी ही नव्हतं इतक. कारण सामाजिक दऱ्या भरून काढायला आर्थिक सुधारणेचा मार्ग खूप सोप्पा आसतो आणि या सुधारणा सगळ्या पर्यंत पोहचवणे म्हणजे दारीद्र्या निर्मूलन. शहरे बदललीत आता गावे ही बदलायचीत आपल्याला. येणाऱ्या बदलाला फक्त पैशाचा रंग नको तर संस्कृतीचा ही असावा, अस काहीतरी करायचय. तर हे कराव लागेल आपल्या सारख्या शिकलेल्या युवकांना. जागाच सगळ ज्ञान एकत्र करून आपल्याला आपल्या अर्थसत्तेचा पाया आधी मजबूत करायचा आहे. आपण शिकलोत आणि आता आपल्या मागे असलेल्या बांधवांना आपण शिकवायचय. जगात घडणारे बदल, ते फ्लॅट होतेय की अजुन गोल होतय की नाहीसच होतय हे त्याना आपण त्यांच्या भाषेत सांगायचय. याने त्यांना कळेल की अर्थार्जनाच्या प्रक्रियेत कुठे बदल करावा लागेल. म्हणजे नेमक कोणता धंदा करायचा नी कसा करायचा हे कळेल त्यांना. आणि जमलतर ते आपणच समजून सांगायचय त्यांना. जमलच आपल्या पैकी कुणाला, तर बिनधास्त जावे त्याने घरी– गावकडे, तालुक्याला, आईच्या हाताची भाकर खावी आणि स्वतःच कराव काहीतरी, रोजगार ही निर्माण होईल आणि कदाचित जास्त पैसा ही मिळेल. आता खरच खूप गरज आहे हे सगळ करण्याची, जमेल त्यांनी आणि जमेल तेंव्हा हे नक्की करावे. कारण तुम्ही नाही गेलात तर मग भांडवलदार येतील तेथे, मोठी दुकाने थाटतील आणि मग आपल्यालाही तिथेच पाठवतील. तेंव्हा ते सांगतील ते कराव लागेल. त्या पेक्षा हे बरं आहे. पण पुन्हा एक सल्ला हा ‘एक‘ मार्ग आहे उत्थानाचा आणि खूप अवघड ही; म्हणून जपून. पण तस पाहिलं तर आधी पेक्षा बराच सोप्पा ही. बघा जमलं तर.
तसेच आपल्या ज्ञानाचा उपयोग करून, जगाच्या अभ्यासाचा उपयोग करून मिळवलेले जागतिकीकरणाचे ज्ञान, त्यात टिकण्याचे ज्ञान आणि प्रगतीसाठीचे ज्ञान समाजातील तळागळाच्या घटकांपर्यंत घेऊन जायला हवे. आऊ जिजाऊच्या कृपेने तूमच्या सारखे युवक या मातीला मिळालेत; तुमच्या सारखे म्हटलंय कारण या विषयावर काही वाचण्याची इच्छा ही आजकाल संपत चालली आहे.महाराष्ट्र अजूनही रायगडावरील पताकेसारखा राष्ट्रात फडकू शकतो, तुमच्या सारख्या समजूतदार इच्छाशक्तीने आणि युवकांच्या सुजाण प्रयत्नांनी. म्हणूंच जमेल ते करा, जमेल तेथे करा,झेंड्याखाली राहून करा की झेंड्या बाहेर जाऊन करा, पण काही तरी समाज उपयोगी करा. कारण इथेच आपली येणारी पिढी जगायची आहेत.

हे सगळं साध्य होण्यासाठी प्रत्येक स्त्रीने आई जिजाऊ होणं गरजेचं आहे...
पुन्हा एकदा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांना त्रिवार वंदन करून, आम्हाला राष्ट्रनिर्मितीचा ध्यास लाव, आम्हाला आणि मुलाबाळांना तर सुखी ठेवच ठेव पण या सुखाला कायम ठेवण्यासाठी एक समाज व्यवस्था निर्माण करान्याची  ताकत दे आणि न ढळणारी दृढ इच्छाशक्ती दे हीच प्रार्थना करू.

-ऋषिकेश सुदर्शन शिंदे.

पंढरपूर जि. सोलापूर

स्वराज्य माझ्या राजांच Android App  Download करा

शिवसह्याद्री  Android App 

Download करा

स्वराज्य माझ्या राजांच Facebook Page 

Like करा

शंभूराजे : एक शापित राजहंस

संभाजी हा शिवाजी महाराजांचा लाडात वाढलेला, रायगडावर तरूणपणी टगेपणा करणारा, थोरातांची कमळा, तुलसी, गोदावरी आदी पोरींना नादी लावणारा, दारू पिणारा, शिवरायांना सोडून मोगलांना मिळणारा, महाराजांनी मोठ्या मिनतवारीने परत आणलेला, अखेर पन्हाळगडावर तुरूंगात ठेवलेला, महाराजांच्या मृत्युनंतर संतापून तुरूंगाचे गज तोडून रायगडावर आलेला जणू वेताळ. राजारामाला तुरूंगात टाकणारा, राजारामाची आई  सोयराबाईंना भिंतीत गाडून मारणारा, औरंगजेबाच्या हाती गाफीलपणामुळे लागलेला, त्याने ‘मुसलमान’ हो म्हटल्यावर ‘तुझी मुलगी देत असशील तर मुसलमान होतो’, असे बाणेदार उत्तर देणारा आणि शेवटी हालहाल करून करून (औरंगाजेबाकडून) मारला गेलेला असा उग्र प्रकृती, अविचारी, व्याभिचारी, शिवरायांचे राज्य बुडविणारा संभाजी असा, खोटा इतिहास  काही जातीयवादी इतिहासकांकडून रचण्यात आला. परंतु वस्तूस्थिती काही वेगळीच होती.

संभाजी महाराजांचे जे दुर्गुण रंगविण्यात आले ते मुळी त्यांच्या वृत्तीत नव्हतेच. जे सद्गुण होते ते सांगण्यात आलेच नाहीत. ते वीर होते त्यांना प्रेमवीर बनवले, ते संस्कृत भाषेत निष्णात होते. हिंदी व संस्कृत भाषेत त्यांचे चार काव्यग्रंथ आहेत. वयाच्या 9 व्या वर्षापासून राजकारणाचे धडे घेत असतानाच वयाच्या 14 व्या वर्षी राजनीतीवरील ‘बुधभुषणम्’ हा संस्कृत भाषेतला ग्रंथ त्यांनी लिहिला. औरंगजेबाचा पुत्र मोअज्जम याच्या छावणीत शिवरायांनी त्यांना दोन वर्षे मनसबदार म्हणून पाठविले. 11व्या व 12व्या राजगडावरील सदरेवरून ते राज्यकारभारात लक्ष घालू लागले. वयाच्या 17 व्या वर्षी रायगडावर त्यांना युवराज म्हणून घोषित करण्यात आले. 19 व्या वर्षी पन्हाळा, श्रृंगारपूर आणि प्रभावलीचे सरसुभेदार म्हणून नेमले होते. मात्र हा सर्व इतिहास झाकून ठेवण्यात आला.    

 

शंभूराजांच्या पराक्रमाविषयीचा थोडासा आढावा घेऊयात. त्यांच्या पराक्रमाविषयीचा इतिहास सांगण्याचा मोह सार्‍या महाराष्ट्राला झाल्याशिवाय राहणार नाही. संभाजीराजांच्या पराक्रमाविषयी शाहीर योगेश म्हणतात,

देश धरम पर मिटने वाला
शेर शिवा का छावा था

महापराक्रमी परम प्रतापी

एकही शंभु राजा था..!

छत्रपती संभाजी महाराजांची कारकीर्द
शंभूराजांच्या प्रखर कारकिर्दीचा काळ होता तो 8 वर्षे आणि 8 महिने. एकाचवेळी अनेक शंत्रुंशी झुंज देणारा, सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज आणि मोगल हे चार शत्रू. त्यातही अवघे मराठी स्वराज्य बेचिराख करण्याच्या हेतुनिशी प्रतिज्ञा करून महाराष्ट्रात जातीनिशी (सात लाख फौजेनिशी) उतरलेला क्रूरकर्मा औरंगाजेब! शंभुराजांनी या अल्पकाळात एकही लढाई न हरता सुमारे सव्वाशे लढाया जिंकल्या. सात लाख फौजेशी आपल्या पंचवीस हजारांच्या बेताच्या सैन्याच्या सामर्थ्यानिशी उणीपुरी 9 वर्षे झुंज दिली. हा जगाच्या इतिहासातील अभूतपूर्व पराक्रम. असा ज्वलज्वलंत संभाजीराजा न भूतो, न भविष्यती…

वर्ष तीनसे बीत गये अब

शंभु के बलिदान को

कौन जीता कौन हारा

पुछ लो संसार को !

महाराजांची युद्धनीती

शंभुराजे आपल्या युद्धनीतीमध्ये शत्रूपक्षाचा जास्तीत जास्त विध्वंस करणे, रसद तोडणे, पाण्यात वीष कालवून शत्रूसेनेची हानी करणे आणि अनेक सेना एकाचवेळी अनेक ठिकाणी लढवणे या युद्ध तंत्राचा वापर करत, आपले सैन्य मोगलांच्या मानाने खूपच कमी हे लक्षात घेऊन त्यांनी ‘खच्चीकरणाची युद्धनीती’ अवलंबिली. शक्य तेथे आक्रमण व शक्य तेथे बचाव असे दुहेरी सूत्र त्यांनी वापरले. शत्रूची युद्धनीती (योजना) ओळखून त्या उधळून लावणे. त्यांती रसद व दळणवळण तोडून टाकणे आणि त्यांची उपस्थिती खिळखिळी करणे हा सुद्धा त्यांच्या युद्धनीतीचा भाग. जेव्हा मोगलांनी नाशिकजवळच्या अहिवंत गडावर हल्ला केला, तेव्हाच बर्‍हाणपूर व सुरत येथे हल्ले चढवून मराठी सेनेने त्यांना जर्जर केले. म्हणजे आपण विचार केला तर असे लक्षात येते की, शत्रूने एका भागावर हल्ला केला असता त्यांच्या दुसर्‍या भागावर हल्ला चढवणे आणि शत्रूचे चित्त विचलीत करून सोडणे.
 

दक्षिणेत सत्ता

1682 साली संभाजी महाराज वीस हजारांचे घोडदळ घेऊन म्हैसूरच्या दिशेने निघाले तेव्हा त्यांचे वय होते अवघे 25 वर्षे. सातारा, मिरज, हुबळी, धारवाडमार्गे चिकमंगळूरच्या ठाण्यावर जाऊन त्यांनी ताबा मिळवला. पुढे चिक्कदेवरायांशी लढाई करून चित्रदूर्ग येथेच आपला दक्षिणेतील सैनिकी तळ निर्माण केला. तेथून ते आपल्या सेनेसह मदुराईकडे रवाना झाले. चित्रदुर्गाहून टुमकूर, चिक्कबाळापूर, धर्मपुरी या मार्गाने त्रिचनापल्लीपर्यंत जाऊन त्यांनी त्याचा ताबा घेतला. नंतर मद्रासच्या दक्षिणेस (म्हणजे आत्ताचे चेन्नई) आपला अधिकार प्रस्थापित केला. औरंगजेबाला यश न मिळाल्याने तो आपल्याच सेनानींवर संशय घेऊ लागला. त्याने शहजादा मोअज्जम आणि दिलेरखान यांनी औरंगाबादेस बोलून घेतले. दिलेरखानाला कैद व शहजाद्याला नजरकैदेत ठेवले. अखेर बादशहाने पुन्हा त्यांना चांगलीच तंबी देऊन व त्याची समजूत घालून त्याला पुन्हा युद्धावर धाडला. दिलेरखानाने मात्र घोर नैराश्याने 20 सप्टेंबर 1683 रोजी आत्महत्या केली.

आता 1683-84 साली संभाजी महाराज गोव्याकडे वळाले. गोव्यातील फोंडा किल्ला त्यांनी सहज सर केला. राजा विजरेई कौंट द आल्व्हारो हा अपयश घेऊन 11 नोव्हेंबर 1683 ला मागारी फिरला. विजरेईला वाटले फोंडा प्रकरण झाल्यावर संभाजीराजे रायगडला परततील. परंतु शंभुराजे उलट अधिकच गोव्याच्या पोटात शिरू लागले. युद्धनिधीस मदत करण्यासाठी विजरेईने 24 नोव्हेंबर 1683 ला गोव्याच्या किल्ल्यावरील एका सभागृहात सभा बोलावली. त्याच दिवशी संभाजी महाराज आपल्या फौजेनिशी स्टीफन म्हणजेच जुवे बेटात उतरले. ते त्यांनी सहज सर केले. हे वृत्त कळताच विजरेई आल्व्हारो मोठी सेना घेऊन जुवे बेट जिंकण्यासाठी धावून आला. मात्र आतून व बाहेरून विजरेईवर जबरदस्त हल्ला झाला. विजरेई गोळी लागूनही गोव्यातून कसाबसा पळाला. त्याचा घोडा मात्र मराठ्यांच्या हाती लागला. ही शोकांतिका बघण्यासाठी खाडीच्या दोन्ही तिरावर गावकरी लोक जमले होते. शंभुराजे इतके बेभानपणे विजरेईचा पाठलाग करत होते की, त्याच्या मागे त्यांनी आपला घोडा नदीत घातला. संभाजी महाराजांच्या हल्ल्याने घाबरलेला विजरेई इतका गर्भगळीत झाला की, त्याने गोव्याच्या चर्चमधील सेंट झेवियरचे शव बाहेर काढून त्यांची प्रार्थना केली. एका कागदावर गोव्याचे सारे राज्य झेवियरला अर्पण केल्याचे त्याने लिहून दिले आणि त्याने गोव्याचे रक्षण करावे असे साकडे घातले.
 

वैतागला बादशहा

संभाजीराजांच्या पराक्रमाच्या वर्तांनी बादशहाचे डोके भणभणून गेेले होते. त्याने रागारागाने आपली पगडी जमिनीवर आपटली आणि शपथ घेतली की, ‘‘संभाजीला मारल्याशिवाय पगडी घालणार नाही.’’ तो म्हणतो, ‘‘टिचभर राज्य आणि बोटभर ताकदीचा हा वितभर तरूण आपल्या विस्तृत राज्याला बेजार करू शकतो, ही कल्पना मला सहन होत नाही.’’ मोगलांचा इतिहासकार महंमद हाशीम खाफी खान शंभुराजांबद्दल लिहितो की, ‘‘दृष्ट संभाजी हा, धामधूम आणि उच्छाद करण्यात नरकवासी काफर शिवा पेक्षा दहापटीने अधिक तापदायक ठरला.’’

संभाजीराजांची जलनीती, दुर्गनीती, युद्धनीती अप्रतिम होती. संभाजीराजांनी आपल्या गलबताची संख्या साडेपाच हजार पर्यंत वाढविली. सैन्य तर शिवरायांच्या सैन्याच्या पाचपट जास्त वाढविले. त्याच बरोबर त्यांनी केवळ राज्याचे रक्षण केले असे नाही तर राज्यदेखील वाढवले. एक इंग्रज लेखक लिहितो की, ‘‘नशीब इंग्रजांचे की तो (संभाजी महाराज) जास्त काळा जगला नाही. तो जर आणखी दहावर्षे जगला असता तर, इंग्रजांना भारतावर दीडशेवर्षे राज्य करायचे तर लांबच पण भारतात पाऊलसुद्धा ठेवता आले नसते.’’

दर्यावरून धोका

छत्रपती शंभुराजांनी आपल्या पाच हजार पाचशे गलबतांच्या सहाय्याने इंग्रजांना झोपवले. सिद्दीला नाचवले आणि पोर्तुगीजांना वाकवले. तीनशे पन्नास वर्षांपूर्वी शंभुराजे दर्यावरून (समुद्रावरून) राज्याचे रक्षण करतात आणि त्यांनी लिहून ठेवले आहे की, ‘‘आपल्या राज्याला धोका जमिनीवरून नाही तर दर्यावरून आहे.’’ आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान युगातील आपण आपल्या राजधानीचे सुद्धा रक्षण करू शकत नाही. आठवा 26 नोव्हेंबर 2008 चा मुंबईवरील हल्ला. आपले सरकार सांगते की, ‘‘आमच्याकडे बोट कमी होत्या’’ मग आपण ठरवावे की श्रेष्ठ कोण? संभाजी महाराज की आजचे सरकार?

तेज पुंज तेजस्वी आखे

निकल गयी पर झुका नही

दोनो पैर कटे शंभु के

ध्येयमार्ग से हटा नही

हात कटे तो क्या हुआं?

सत्कर्म कभी छुटा नही

जीव्हा कटी खुन बहाया
धरम का सौदा किया नही

शाहीर योगेश यांच्या या पंक्ती वाचल्या की, राहून राहून मनात विचार येतो की, एखादा व्यसनी, रंगेल, उग्र प्रकृतीचा, अविचारी, व्याभिचारी व्यक्ती राज्य इतके चालवू शकेल काय? शंभुराजे कोणत्याही गाफीलपणामुळे पकडले गेले नाहीत तर ते फितुरीमुळे पकडले गेले. त्यावेळी ते अवघ्या 32 वर्षांचे होते. त्या औरंगजेबाने त्यांचे डोळे फोडले. जीभ तोडली. हात कापले. तरीही संभाजीराजे झुकले नाहीत. धर्मासाठी बलिदान देणारा असा राजा कुणी पाहिला आहे का? परंतु हे शंभुराजे आमच्या महाराष्ट्राला माहितच नाहीत. किंबहुना ते जाणीवपूर्वक सांगितले गेले नाहीत.

आपले खापर पणजोबा बाळाजी आवजी चिटणीस यांना शंभुराजांनी हत्तीच्या पायी दिल्यामुळे याचा सूड मल्हार रामराव चिटणीस याने शंभुराजांच्या मृत्युनंतर 122 वर्षांनी घेतला आणि तोही सभासद बखरीच्या मुळच्या मसालेदार बखरीत खोट्यानाट्याचाच मसाला बेमालूमपणे घुसडून देऊन संभाजी राजांचे चरित्र लिहिले. संभाजी राजांना व्यसनी ठरवले यानेच. पन्हाळ्याच्या सुभेदाराला कैदी बनवले यानेच. स्त्रीयांशी अनैतिक संबंध चिटकविले यानेच! याच्याच कुपीक मेंदुने सोयराबाई राजेंना भिंतीत गाडून मारल्याचा जावईशोध याचाच! खरे तर सोयराबाईंनी आत्महत्या केली असल्याचे सांगितले जाते.

शंभुराजांबद्दल अटलबिहारी वाजपेयी लिहितात की, ‘‘व्यक्ती की पुण्याई, व्यक्ती की शक्ती, व्यक्ती का स्वत्त्व प्रकट होता है अंतिम क्षणो मे. संभाजी महाराज समझौता कर सकते थे, पर उन्होने वह नही किया. अगर वह शरीर से दुर्बल होते, अगर मन के कच्चे होते, जीस तरह के व्यसनो का उनके जीवन चरित्र मे उल्लेख किया जाता है, अगर उस तरह के व्यसन के वे शिकार होते तो, अंतिम परिक्षा मेे विफल हो जाते. लेकीन वे अंतिम परिक्षा मे सफल रहे. पिढीयो तक उनके बलिदानसे हमे प्रेरणा मिलेगी. उन्होने जीवन का क्षणक्षण, शरीर का कणकण स्वतंत्रता के लिए समर्पित किया.’’ ही किर्ती आहे माझ्या शंभुराजाची!
 

कोटी कोटी कंठो मे तेरा

आज जयजयकार है

मातृभूमी के चरणकमलपर

जीवन पुष्प चढाया था

है दुजा दुनिया मे कोई

जैसा शंभु राजा था?

क्योंकी वह शेर शिवा का छावा था!
जय महाराष्ट्र..!

संकलन - ऋषिकेश सुदर्शन शिंदे

पंढरपूर जि. सोलापूर.

अधिक माहितीसाठी

खालील apps Download करा

स्वराज्य माझ्या राजांच Android App Download करा

 शिवसह्याद्री  Android App 

Download करा

स्वराज्य माझ्या राजांच Facebook Page 

Like करा

शिवराय आचरणात आणणे आहे !!

रोज सकाळी पेपर उघडला कि,पहिली बातमी दिसते कि खून, बलात्कार, चोरी, दरोडा, आत्महत्या अशीच, आणि आता ते इतका सवयीचा झालाय कि बहुतांश लोक अशा बातम्या वाचताच नाहीत. हे नेहमीचाच म्हणतात आणि पुढचा पान उलटतात. आपली मन मरत चालली आहेत.

शिवशाही च्या आधीची परकीय राजवट आठवा तेव्हा भारत असाच होता. दिल्ली ची जुलमी राजवट अशीच होती, तेव्हा हि असाच होता कि रस्त्याने जाताजाता बायकांना उचलून नेण. कधीही कुठेही कोणाचीही लुटालूट करण. खून करन. सरकारी कर्मचाऱ्यांचा जनतेला असाच त्रास होता, सरकार विरोधी फिर्याद करणार्याला कितीही बरोबर असला तरी उलट फोजदरी जाच असायचा. हेच सगळ होत. तेव्हा सत्ता होती परकीयांची. आनंदाने एकोप्याने भारतात राहणाऱ्या आपल्या लोकांना ग्रहण लावलं या बाबर, मुघालान्सारख्या यवनी सत्तांनी. पण मग पुन्हा सूर्योदय झाला आणि एक वेळ अशी आली जेव्हा आपल्या शिवरायांची सत्ता आली. राजा कसा असावा, राज्य कसा असावे, राज्यकारभार कसा असावा, गुन्हेगारांवर वाचक कसा ठेवावा, सरकारी नोकराने रायातेशी कसे वागावे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे जर बदल करायचाच असेल तर प्रयत्न केला तर अपेक्षित बदल करता येतो हे शिवरायांनी केल आणि दाखवला. आपली मुठभर मराठी सेना घेऊन यावनंसारख्या शत्रूला उलथवून लावणारे शिवराय, परस्त्री बरोबर गैरवर्तन करणाऱ्या रंज्याचे पाटलाचे हाथ पाय कलम करणारे शिवराय. परस्त्री बरोबर मातेसमानच वागायला हवे हे शिकवणारे आणि आपल्या वर्तनातून ते दाखवून देणारे शिवराय. स्वतापेक्षा धर्माचे आणि धरणीचे महत्व जाणणारे आणि मानणारे शिवराय. स्वकष्टाने उभारलेले स्वराज्य कायम श्रींचे म्हणून श्री चरणी लीन होणारे शिवराय. अशाच राज्य कर्त्याची आता आपल्याला गरज आहे.

कारण तीच यवन संस्कृती परत भारतावर राज्य करू पहात आहे. देशात रोज शेकडो बलात्कारासारखे गुन्हे घडतात कित्येक गुन्हे उजेडात हि येत नाहीत. आपल्या आजूबाजूला जे चाललाय ते जोवर आपल्या स्वतावर येत नाही तोवर तिकडे न बघण्याची वृत्ती वाढत चाललीये. केंद्रात सत्ता असणारे पक्ष या गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करताना दिसतायत कारण त्यांना कागदोपत्री सगळ छान छान दाखवायचं. पण मांजर जेव्हा डोळे मिटून दुध पिता तेव्हा सगळ्या जगाला दूध पिताना ते मांजर दिसताच असत तसाच काही या राज्यकर्त्यांचा झालाय त्यांना वाटतंय हे जे चाललाय ते कोणाला दिसत नाहीये. पण जे हे सगळ भोगतायत त्यांना दिसायची काय गरज आहे.

आज हजारो युवक एकजूट होऊन पुन्हा सरकार विरोधी आंदोलन निदर्शन करत आहेत, गेली साठ वर्ष शांत झालेला युवा रक्त आता पुन्हा पेटून उठताय. साठ सत्तर वर्षापूर्वी हि अशीच एक परकीय सत्ता उलथवून लावणारी एक युवक क्रांती झाली होती. आत्ताही पुन्हा हा लढा लढायची वेळ येऊ लागलीये आता गरज आहे ती फक्त ह्या रक्ताला दिशा देणाऱ्या शिवराया सारख्या नेतृत्वाची. आणि अशा युवकांचे पाठबळ वाढवणाऱ्या जिजाऊ सारख्या मातांची.

"शिवाजी जन्माला यावा परंतु दुसऱ्याच्या घरात"

हि मनोवृत्ती जो पर्यंत आपण बदलत नाही तो पर्यंत हा बदल होणे शक्य नाही..

"राजे पुन्हा जन्माला या" अस म्हणण्यापेक्षा आपल्या विचारात ,आचरणात राजे आणण्याची गरज आहे...

लेखन: ऋषिकेश सुदर्शन शिंदे...

अधिक माहितीसाठी

खालील apps Download करा

स्वराज्य माझ्या राजांच Android App Download करा

 
शिवसह्याद्री  Android App 

Download करा

स्वराज्य माझ्या राजांच Facebook Page 

Like करा

Wednesday, 31 May 2017

जाणत्या राजाचे दूरगामी व्यवस्थापन !

छत्रपती शिवरायांचे जीवनच एवढे भव्य आहे की, त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक दिवसावर एक ग्रंथ निर्माण व्हावा. आज्ञापत्रातून त्यांच्या पर्यावरणविषयक भूमिकेचा अभ्यास करता हा राजा काळाच्या किती पुढे होता याची महती पटते. शिवरायांनी प्रत्येक किल्ल्यांवर केलेले काटेकोर जल व्यवस्थापन, स्वच्छतेबाबत त्यांचा निकोप दृष्टिकोन तसेच पर्यावरणाविषयी त्याचे अत्यंत महत्त्वाचे विचार हे पाहता ख-या अर्थाने हा राजा पर्यावरणाचा प्रणेता होता. आज संपूर्ण जग जागतिक तापमानवाढीने त्रस्त आहे. या पार्श्वभूमीवर, शिवरायांच्या विचारात, त्यांच्या धोरणात आपल्याला नवी दिशा मिळेल.

शिवरायांचे जल व्यवस्थापन


किल्ल्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने सर्वात प्रथम पाण्याचे महत्त्व अत्यंत महत्त्वाचे व अनन्यसाधारण आहे. त्यात सहय़ाद्रीत व एकंदर भारतात चार महिने पाऊस पडतो. त्यामुळे प्रत्येक किल्ल्यावर पाण्याची साठवणूक शिवराय काटेकोरपणे करत असत. शिवकाळात विजेचा शोध लागला नव्हता. त्यामुळे विद्युतपंपाने पाणी खेळवणे, हे त्या काळी शक्य नव्हते. मात्र त्याही परिस्थितीत शिवनिर्मीत प्रत्येक किल्ल्यावर वर्षभर पुरेल व प्रसंगी गडावर जर हल्ला झाला तर आणीबाणीच्या काळातही आवश्यक तो पाणीसाठी कसा राहील, याची योग्य ती काळजी शिवरायांनी घेतलेली आहे. त्याचे मुख्य कारण त्याकाळी जलाभेद्य खडकांचे थर आणि पाझरणारे खडक यांच्या साहाय्याने पाणीसाठा करता येऊ शकतो, हे तत्कालीन पाथरवटांच्या (खडक फोडणारी जमात) लक्षात आले होते. त्यामुळे अशा हरहुन्नरी लोकांकडून शिवरायांनी किल्ल्यामध्येच खाणी अथवा हौद किंवा दगडांच्या उतरणीवर खोल खड्डे निर्माण करून पाणी सतत पाझरत राहील, याची व्यवस्था केली होती. त्याचबरोबर अशा जलाभेद्य खडकांची जर मुबलकता आढळली तर त्यातले मधले खडक अलगद काढून किंवा त्यांना पाणी पाझरत राहील इतके तासून तलाव तयार केले व पाण्याची वर्षभर मुबलकता कशी राहील, याकडे विशेष लक्ष दिले. रायगडावरील गंगासागर तलाव, कोळींब तलाव, सज्जनगडावरील सोनाळे तलाव, प्रतापगडावरील रहाटाचे तळे, भवानी तलाव ही त्याची काही उदाहरणे आहेत. त्याचबरोबर सपाट व नागरी वस्त्यांमध्ये शिवरायांनी विहिरी, तलाव, पाणवठे खोदून घेतले होते. रायगडावरील शिलालेखात रायगड बांधणा-या हिरोजी इंदुलकर यांनी.. ‘वापी, कुप, तडाग’ असा केलेला उल्लेख फार महत्त्वाचा आहे. राजधानी रायगडाच्या दृष्टीने पाणीसाठा गंगासागर, हत्ती तलाव, हिरकणी तलाव, बामण तलाव, काळा हौद, कुशावर्त तलाव, चांभार टाके, हनुमान टाके अशा विपूल पाणी साठवण्याच्या जागा वर्षभर पुरेसा पाणी पुरवठय़ाच्या दृष्टीने शिवरायांनी गड बांधतानाच करवून घेतल्या होत्या. इतर किल्ल्यांवरही पाण्याची मुबलकता लोकांना उपलब्ध करून दिली होती. मात्र त्याचे नियोजन अगदी काटेकोर होते. शिवरायांचे वन व्यवस्थापन वनस्पती आणि माणूस यांचे एकमेकांशी असणारे नाते शिवरायांनी ओळखले होते. शिवरायांच्या संघर्षमय जीवनातदेखील पर्यावरणाचे संतूलन ठेवणारी वनश्री त्यांच्या नजरेआड झाली नाही. त्या काळची वनराई ही भरमसाठ असूनही त्याचा ऱ्हास शिवरायांनी कधीच होऊ दिला नाही. प्रत्येक गडावर व गड परिसरात शिवरायांनी आंबा, वड, नारळ, शिसव, बाभूळ, ऐन, यांची लागवड केली होती. आरमारासाठी साग व शिसवी झाडे वापरली जात असत. फळ, फळांवरासाठी आंबा, चिकू, फणस इत्यादी झाडे इतकेच नव्हे तर संदेश वहनासाठी काळा धूर व पांढरा धूर सोडणारी झाडेही शिवरायांनी खास लावली होती. त्यांचा उपयोग त्याप्रमाणे करूनही घेतला होता.


आज्ञापत्रात शिवराय निसर्गसंवर्धनाबाबत किती जागरूक होते, याचा प्रत्यय येतो. ‘रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये’ हे शिवरायाचे तत्त्व होते. अगदी गरज पडल्यास शेतक-यास योग्य तो मोबदला देऊन झाडे खरेदी करावीत. रयतेस तोशीस पडता कामा नये. आंबा, फणस ही झाडे लेकरांसाठी वाढवली. मात्र सैनिकांनी बळजबरीने तोडल्यास त्यांच्या दु:खाला पारावार उरत नाही, अशी त्यांची भावना होती. इतके पर्यावरण व रयतेच्या बाबतीतले स्पष्ट विचार पाहून हा राजा जनतेचा किती विचार करत होता, हे लक्षात येते. शिवरायांचे समकालीन संत तुकाराम यांचा ‘वृक्षवली आम्हा सोयरी वनचरे’ हा अभंग शिवरायांनी केवळ घेतला नाही, तर प्रत्यक्ष आचरला. गड, परिसराच्या मोकळय़ा जागा, बागायती जागा, डोंगरपायथ्याचे अनेक भूखंड त्यांनी ओलिताखाली आणून जाणीवपूर्वक झाडे वाढवली.

स्वच्छतेचे अनोखे व्यवस्थापन 


 छत्रपती शिवरायांनी सतराव्या शतकात आपल्या गडकोटात शौचकुपांची व्यवस्था केली होती. आजच्या काळातही आवर्जुन जाऊन बघावी अशी मलमूत्र विसर्जनाची अनोखी व्यवस्था आपल्याला थक्क करून टाकते. शिवरायांच्या पर्यावरण व ग्रामस्वच्छतेचा दृष्टिकोन किती निकोप होता, याचे हे उत्तम उदाहरण ठरावे. आजच्या काळात आपण निर्मल ग्राम स्वच्छता अभियान राबवून त्यावर कोटय़वधी रुपये खर्च करतो; परंतु १७व्या शतकात अशा प्रकारची योजना शिवरायांनी कुठलाही गाजावाजा न करता भ्रष्टाचारमुक्त वातावरणात राबवली होती, हे विशेष! आजही प्रतापगडाच्या पूर्वेकडील बुरुजात, रायगड, राजगड, पुरंदर येथील ब-याच सुस्थितीत असलेली शौचकुपे पाहाता येतात. पहा-यावरील सैनिकांनी नैसर्गिक विधीसाठी कुठेही लांब व पहारा सोडून जाऊ नये, यासाठीही ही व्यवस्था. इतकेच नव्हे तर मलमूत्र खोल तटबंदी बाहेर दरीत पडण्याची व्यवस्था पाहून शिवराय काळाच्या किती पुढे होते, याची साक्ष पटते. गडावरच्या वस्तीमध्येही व गडावर कुठेही, कचरा साठला तर तो जाळून त्याची राख जमिनीत टाकून त्यावर भाज्या पिकवण्यात याव्यात, गड राबता व स्वच्छ ठेवावा, विहिरी, पाणवठे, सदैव स्वच्छ ठेवावेत, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट, शोषखड्डय़ाची व्यवस्था, कंपोस्ट खतासाठी, सोनखतासाठी सदैव आग्रही दृष्टिकोन पाहता शिवरायांच्या स्वच्छताविषयक दृष्टिकोनाची प्रचिती येते. आज हगणदारीमुक्त गाव व हगणदारीमुक्त समाज करण्यासाठी जे शासनाकडून प्रयत्न होत आहेत. पैसा खर्च होत आहे, मात्र अजूनही अपेक्षित यश येत नसताना शिवरायांनी संपूर्ण भष्टाचारमुक्त योजनेतून ही संकल्पना १७व्या शतकात यशस्वीपणे राबवली, ते पाहता शिवराय जलसंवर्धन, वनसंवर्धन व ग्रामस्वच्छता योजनेचे ख-या अर्थाने प्रणेते होते, यात शंका नाही. अशा जाणत्या राजाला मानाचा मुजरा.
 

संकलन : ऋषिकेश सुदर्शन शिंदे...


 अधिक माहितीसाठी खालील Apps Download करा  

स्वराज्य माझ्या राजांच Android App Download करा

शिवसह्याद्री Android App Download करा

स्वराज्य माझ्या राजांच Facebook Page Like करा‬

श्रीशिवराज्याभिषेक

रायगड सजले , भारतात समाज शासनबद्ध झाला आणि मराठ्यांच्या राज्यकारभारात नवे पर्व सुरू झाले- राजधानी रायरीवर शिवाजी महाराजांचा राज्...