भेटीच्या दिवशी अफजलखान भेटीच्या वेळेआधीच शामियान्यात आला. शिवाजींनी जाणून बूजून अतिशय भव्य शामियाना बनवला होता. निःशस्त्र भेटायचे ठरले असले तरी खानाने आपल्या अंगरख्याखाली बिचवा लपवला होता व खानाकडून घातपाताची शक्यता शिवाजींनी १०० टक्के धरली होती. त्यामुळे त्यांनी अंगरख्या खाली चिलखत चढवले होते व लपवण्यास अतिशय सोपी वाघनखे हातामध्ये लपवली होती. भेटीच्या सुरुवातीसच खानाने शिवाजींना अलिंगन देण्यास बोलवले व उंच अफजलखानाने शिवाजींना आपल्या काखेत दाबून बिचव्याचा वार केला. परंतु चिलखत असल्याने शिवाजी महाराज बचावले. खानाने दगा केलेला पाहून शिवाजींनी लपवलेली वाघनखे काढली व खानाच्या पोटात घुसवून त्याची आतडी बाहेर काढली. अनपेक्षित प्रतिवाराने भेदरलेल्या खानाने दगा दगा असा आक्रोश केला व इतर अंगरक्षकांना सावध केले. इतर अंगरक्षकांच्यात तिथेच जुंपली. सय्यद बंडाने शिवाजींवर वार केला परंतु तो जिवा महाले (संकपाळ) यांनी आपल्यावर घेतला व शिवाजींचा रस्ता मोकळा केला. इकडे खान त्याच्या पालखीत स्वार झाला परंतु संभाजी कावजीने प्रथम पालखी वाहणार्या भोईंचे पाय तोडले व जखमी अफजलखानाला मारून त्याचे शीर धडापासून अलग केले. शिवाजींनी हे शीर नंतर आपल्या मातोश्रींना भेटीदाखल पाठवले. शिवाजींनी झपाट्याने किल्यावर प्रयाण केले व तोफांनी आपल्या सैन्याला अफजलखानाच्या सैन्यावर आक्रमण करायचे आदेश दिले. मराठे सैनिकांच्या तुकड्या प्रतापगडाच्या जंगलात दबा धरून बसल्या होत्या. तोफा धडाडताच त्यांनी अफजलखानाच्या सैन्यावर झपाट्याने काही कळायच्या आत आक्रमण केले. कान्होजी जेधे याने बंदूकधार्यांवर आक्रमण केले. दुसर्या एका कमानीच्या हल्यात मुसाखान जखमी झाला व पळून गेला. अफजलखानाच्या सैन्याची वाताहत झाली.नेताजी पालकर यांच्या नेतृत्वाखाली घोडदळाने अफजलखानाच्या वाईच्या तळावर अचानकपणे हल्ला चढवला व तेथेही त्यांची वाताहत केली. आदिलशाही सेनेसाठी हा जबरदस्त पराभव होता. अफजलखानाचा वध ही संपूर्ण आदिलशाहीसाठी मोठी घटना होती. जवळपास ५,००० सैनिक मारले गेले व तितकेच जखमी झाले. जवळपास ३,००० सैनिक युद्धबंदी बनवण्यात आले. मराठ्यांचे पण त्यांच्या सैनिकक्षमतेच्या दृष्टीने थोडेफार नुकसान झाले. शिवाजींनी विरोधी सैन्यातील बंदीवानांना योग्य तो मान दिला. जखमींची योग्य ती शुश्रुषा केली गेली. कोणत्याही बंदीवान स्त्री अथवा पुरुषांवर अत्याचार झाले नाहीत. बऱ्याच जणांना परत विजापूरला पाठवण्यात आले.
इतिहासाच्या काळोखात लुप्त झालेल्या आणि निधड्या छातीवर गानिमांचे वार झेलून आपल्या पिढीसाठी जे शूरवीर लढले अशा मावळ्यांसाठी, अशा विरांविषयी विषयी अजून बरेच लिखाण व्हायला हवे होते परंतु तेवढे नाही ही खंताचीच बाब ..
अशाच वीरांपैकी एक शूरवीर ज्यांनी त्यांच्या अतुलनीय साहसाने, पराक्रमाने कायम माझ्या मनात घर केलेले आहे असे मर्द मराठा वीर म्हणजे “शूरवीर दत्ताजी शिंदे”
“भीषण अन भयाण अशा काळ्या रात्रीत कुठतरी धूसर चांदण पडल्यामुळे गीलच्यांना फक्त एकमेकांची तोंड दिसत होती..
लांबच लांब अशा पडलेल्या खाश्या डेर्यापैकी एका शाही डेर्यातून कुजबुज सुरु होती, गुप्त मसलत घडत होती, मराठा साम्राज्यावर चालून आलेल्या त्या अब्दाली नामक राक्षसाला या शाही डेऱ्यात जो तो मस्का मारण्यामध्ये अजिबात कुचराई करत नव्हता..
आणि यामध्ये आघाडीवर होता तो नजीब, तसेच कुतुबशाह…. बऱ्याच चर्चेअंती नजीबाने अब्दालीला ताबडतोब मराठा छावण्यावरती हमला करण्यासाठी मनधरणी करून तयार केलेच.. त्याची हातभार खोटीखोटी प्रशंसा देखील केली..
मल्हारबाबा अजूनही दत्ताजी पर्यंत पोचलेच नव्हते, अन मल्हारबा येईपर्यंत निशाणाला धक्काही लागू द्यायचा नव्हता असा जणू दत्ताजी शिंद्यांनी प्रतिज्ञाच केली होती, पण या मराठा भूमीवर धडकलेल्या दुश्मनाला, या काळ्या सापाला, म्हणजे नजीबाला मात्र दत्ताजी तसेच शिंद्याच्या फौजेला गाठून त्यांचा खातमा करावयाचा मनसुबा होता..
चर्चा संपता संपता बादशाहने हुकुम सोडला कि “सुरज कि पहिली रोशनी के साथ अपनी एक फौज यमुना पार करेगी और उसे नजीब और कुतुबशहा संभालेंगे”
नजीबाच्या अंगाअंगात लाडू फुटू लागले.. झोप तर जवळजवळ डोळ्यातून उडूनच गेली होती.. कधी पहाट होते आणि कधी या मरगठ्यांच्या चिंधड्या चिंधड्या करतो अशी त्याची अवस्था झाली होती..
यमुनेच्या दुसऱ्या तीरावरती जानराव बावळे आपल्या चार हजाराच्या फौजेसह बुराडी घाटाचे रक्षण करत होता, पहाटेची वेळ आणि बोचरी थंडी अंगाला झोंबत होती.. समोरून येत असलेल्या महाभयानक संकटाची त्याला चाहूलही नव्हती..
यमुनेचे पाणीही थोडे आटल्याने बुराडी घाट आज वेगळाच भासत होता, हळूहळू उन वर चढू लागली आणि ९ वाजण्याचा सुमार झाला असेल नसेल तेव्हढ्यात २-४ रावतांनी अक्षरशः कर्कश आवाजात गलका केला..गोंगाट करून ओरडू लागले..
“उठा……उठा….. गिलचे आले……गनीम आले…. उठा……उठा…..”
कावरेबावरे झालेल्या जानराव बावळ्यान्नी नजर रोखून पहिले तर गनिमांच्या रांगाच रांगा दिसू लागल्या, जानराव सावध पवित्रा घेत म्हणाले
“चला.. उठारं.. बोला…… हर हर महादेव…. हाना… मारा…. माग सरू नगासा”
समद्या रावतांना जणू चेव चढला आणि बंदुका आग ओकू लागल्या.. तलवारी तळपू लागल्या…. गीलच्यांनीही मग जम्बुरक्यामधून आगी धडाडन्यास सुरुवात केली.. बंदुकीतून गोळ्यांचा जणू वर्षाव सुरु केला….
अफगाणांचा असंख्य फौजफाटा पाहून जानरावांनी कुमकीसाठी दत्ताजीकडे टाकोटाक स्वार पाठीवले..
ही खबर मिळताच दत्ताजी शिंद्याच्या अंगाअंगातून वीज सळसळून गेली…. जणू काही दत्ताजी या क्षणाची वाट पहात होते..
विलंब न करता दत्ताजींनी ३ तुकड्या केल्या अन आपल्या आवडत्या अन सजवलेल्या लालमणीवरून रणांगनाकडे टाच मारली.. हातात तळपती तलवार….
लालमणीचा लगाम खेचत अन हर हर महादेव चा गजर करत दत्ताजी अन मराठा सैन्य विजेच्या त्वेषाने रणांगणाकढे झेपाऊ लागल.. गिलच्यांच्या नरडी कधी फोडणार अन त्या नरडीचा घोट कधी घेतो या नुसत्या कल्पनेने मराठे झेपावत होते…. अंगाअंगावर रोमांच फुलात होते..
हा हा म्हणता काही वेळातच दोन्ही फौजा एकमेकाला भिडल्या, नुसता हाहाकार माजला.. अफगानाकडे जशा बंदुका होत्या, जशी शस्त्रे होती त्याच्या तोडीस मराठ्यांकडे होत्या फक्त तळपत्या तलवारी… यामुळे काही वेळातच घाटात रूप पार पालटून गेले….
मराठ्याकडे बंदुका जवळजवळ नव्हत्याच, त्यामुळे अर्थातच मराठ्यांच्या रक्ताचा पाट वाहू लागला.. मराठ्यांच्या मुडद्याचे ढीग दिसू लागले.. कुणाचा बाप मेला कुणाच्या पोराने तडफडत समोर जीव सोडला, कुणाचा काका तर कुणाचा चुलता.. पण याचे भान होतेच कुणाला ? दिसत होती ती फक्त अफगाणी घुबडे अन त्यांच्या मुंड्या… काही वेळातच मराठ्यांच्या हाडामासाचा नुसता चिखल दिसू लागला.. मराठ्यांच्या सळसळनाऱ्या रक्ताचे नुसते पाट वाहू लागले, त्या रक्तातून ही अफगाणी घुबड पळत होती… त्या रक्तावरून घसरत होती… जगदंब ! जगदंब !
अशी पडझड चालल्याची भयंकर खबर दत्ताजी पर्यंत पोचते न पोचते तोच कमी कि काय म्हणून आणखी २ धक्कादायक खबरी येऊन धडकल्या…. मालोजी फौजेसह मराठ्यांच्या मुडद्याच्या राशीत बेपत्ता झाले आहेत अन उरल्यासुरल्या फौजेनिशी बुराडी घाटाकडे माघारा फिरत आहेत…. अन दुसरी म्हणजे गनिमांनी एकाच वेळेत तिन्ही बाजूंनी हमला केला आहे..
रणमदाने बेहोष झालेला दत्ताजी शिंदे लालमनीवर स्वार झाला, लालमणी थुईथुई नाचू लागला, मर्द मराठा जवान वीर, शिरावर शिरस्त्राण, पाठीवर ढाल, हातात तळपती तलवार असा दत्ताजी चा रणमर्दाचा अवतार पाहून मराठ्यांना नव-स्फुरण चढले..
“हर हर महादेव” चा जयघोष करत या मर्दाने जणू काळावर झेपावे तसा लालमणी गनिमांवर घातला..
तलवारीच्या घावासरशी मुघली घुबडांचे मस्तक उडवू लागला.. बिनामुंडक्याच्या धडातून रक्ताची चिळकांडी उडत होती..
उडालेल्या मुंडक्याचा खच दिसत होता तसे मराठे बंदुकीलाही घाबरेना झाले अन आपसूक मुघली बंदुकीच्या टप्प्यात येऊ लागले.. हळूहळू मराठे निपचित पडून दिसेनासे होऊ लागले.. तसा दत्ताजीच्या जवळ येऊन तानाजी खराडे म्हणाला
“बाबा पडती बाजू झालिया.. कुनीबी दिसना गेलया, निशाण गुंडाळाव अन निघावं”
हे ऐकताच दत्ताजी जणू कडाडलाच….
”या रणांगणासाठीच अन या दिसासाठीच तर माझा जन्म आहे, दत्ताजी यमासमोर देखील उभा टाकील मग ह्या घुबडांना पाठ दाखवू ? शक्य नाही “
इतका वेळ निशाणापाशी झुंजत असलेला जनकोजी दंडावर गोळी लागल्याने घोड्यावरून खाली कोसळला, कुणीतरी घाबरून अन ते भयावह दृश्य पाहून दत्ताजींना म्हणाले
“बाबा, घात झाला….जनकोजीबाबा ठार झाले”
दत्ताजींच्या कानाच्या पाळ्या तप्त झाल्या, बाहू स्फुरण पावू लागले, अंगातले रक्त लाव्ह्याप्रमाणे उसळू लागले.. जगदंबे आज तुझे भुत्ये इथे राक्षसाचे मर्दन करणारच या भावनेने अन सुडाने दत्ताजी नुसता धगधगत होता… रागाने लालबुंद झालेला दत्ताजी हातात तलवार घेऊन पुढे झेपावत होता..
एव्हड्यात डोळ्यासमोर हलकट नजीब दिसताक्षणी क्षणाचाही विलंब न लावता हातातील समशेर उंच उडवत “हर हर महादेव…. जय भवानी” च्या जयघोषात दत्ताजी आवेशाने नजीबाकडे झेपाऊ लागला आणि वाटेतल्या अफगानावर तुटून पडला.. समशेरीच्या दणक्यासरशी अफगाणी माकडांची मुंडकी उडवू लागला, सपासप बरगडीत तलवार घुसवू लागला..
इतक्यात अचानक एक जम्बुऱ्याचा गोळा धडधडत येऊन दत्ताजीच्या बरगडीस छेदून लालमणीवर धडकला तसा दत्ताजी खाली पडला.. निपचित पडलेल्या आपल्या प्रिय लालमणी कढे पाहू लागला….
नजीबाला अन कुतुबशहाला हे दृश्य पाहताच आकाश ठेंगणे झाले.. दोन्ही सैतानासारखे दत्ताजीकडे झेपावले..
दत्ताजी तळमळत असलेला पाहून कुतुबशाहने दत्ताजीची मान पकडली अन हातातले खंजीर दत्ताजीच्य्या डोळ्यासमोर नाचवत म्हणाला….
“बोलो पाटील…….और लढोगे?”
हे ऐकताच दत्ताजींनी सर्व ताकत एकवटत वाघासारखी डरकाळी फोडली…..
“क्यों नही? बचेंगे तो और भी लडेंगे”
मराठा वीराची ही जिद्द, ही डरकाळी कानावर पडताच कुतुबशहा कुत्र्यासारखा दत्ताजींच्या अंगावर बसला अन हातातल्या खंजिराने दत्ताजींच्या छातीची चाळणी करू लागला.. अंदाधुंद खंजीर छातीत घुसवू लागला.. अशातच अंगात संचारलेल्या हैवानासारखा नजीब हे दृश्य पाहून बेभान झाला अन झटक्यात हातातला जमदाडा दत्ताजीच्या मानेवर घातला अन दत्ताजीची मान धडावेगळी केली.. दत्ताजीची मान खाली पडली तरीही चेहऱ्यावरचे ते सूर्यासारखे तेज अन डोळ्यातील अंगार पाहून नजीब आणखीन चेताळला..
दत्ताजीचा देह हळूहळू रक्ताने पूर्ण माखत माखत थंड पडू लागला..
या हरामखोर नजीबाने जवळच्या एका रोहील्याच्या हातातला भाला हिसकावून घेतला अन दत्ताजीचे मुंडके हातात घेऊन भाला त्यात खसकन खुपसला.. अन तो भाला हवेत उडवू लागला…..
आणि तसाच बेधुंद झालेला नजीब पळणाऱ्या मराठ्यांना अभय द्यायचे सोडून पाठलाग करून कत्तल करण्याचा आदेश देऊन तो मुंडके खोवलेला भाला घेऊन नाचत नाचत अब्दालीकडे निघून गेला…..
बुराडी घाटाच्या त्या धरणीमातेला स्वतःचा ठोकाच जणू चुकल्यागत वाटू लागले…. नदीच्या पाण्याला दिशा सैरभैर वाटू लागली…. अवतीभवतीच्या झाडाला, पानांना कंठ दाटून आला…. हे भयावह दृश्य पहात असलेले अफगाणी गिलचे देखील स्तब्ध झाले..
आपल्याच स्वतःच्या धरणीवर या मर्द मराठ्याने बुराडी घाटाच्या त्या रणांगणावर रक्ताचा अभिषेक केला…. पण निश्चय मात्र तिळमात्र ढळू दिला नाही.. ना माघार घेतली ना नुसता माघार घेण्याचा विचार केला……
ऋषिकेश सुदर्शन शिंदे.
शिवसह्याद्री Android App