Friday, 5 June 2020

श्रीशिवराज्याभिषेक


रायगड सजले , भारतात समाज शासनबद्ध झाला आणि मराठ्यांच्या राज्यकारभारात नवे पर्व सुरू झाले-

राजधानी रायरीवर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे त्यांच्या नवीन कारकीर्दचा ह्या विश्वखंडातील एक बळकट असलेला उंबरठा जो कधी कुठल्या सत्ताधीशाला तोडता आला नाही , आणि तो उंबरठा म्हणजे दक्षिण-दिग्विजय.

रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होत असता पुढची मोहीम त्यांनी आधीच आखलेली.दक्षिण दिग्विजय करताना इंग्रज कर्नाटक मध्ये आहेत हे महाराजांना माहीत होते , ह्या भागात शिवाजी राजे पत्र लिहून पाठवतात त्यांना माणसांची मदत मागायला कारण मराठ्यांचं राज्य वाढलं पाहिजे -

दक्षिण-दिग्विजय हा शिवाजी महाराजांचा यशाचा परमोच्च बिंदू . या मोहिमेत त्यांना फार मोठे यश लाभले आणि कर्नाटक प्रांतातील सुपीक व धनसंपन्न प्रदेश महाराजांच्या ताब्यात आला .नव्या प्रांताच्या रक्षणासाठी त्यांनी ताबडतोब पावले उचलायला सुरवात केली . जिंजीचा किल्ला ताब्यात आल्यावर त्यांनी त्या प्रांतातील जुने कोट, गड , गढ्या जमीनदोस्त करून नवीन दुर्गबांधणी करण्याची मोठी धाडसी योजना आखली व ती हाती घेतलेली आहे. ह्यात एक समजून घ्यायचे की वेळ कमी आणि काम अफाट आहे अशी परिस्थिती होती. कुदळी पहारींनी जुनी तटबंदी पाडण्यासाठी बराच वेळ लागणार आणि तो कमी केला पाहिजे हे महाराजांना माहीत होते. त्याचं कारण असं की त्याशिवाय नवीन बांधणी सुरू करता येणार नव्हती. आणि सुरुंग लावून तटबंदी उध्वस्त करण्याची कला वेंगुर्ल्याच्या डचांना , गोव्याच्या पोर्तुगीजांना आणि मुंबईच्या इंग्रजांना चांगली अवगत होती.

स्वराज्याच्या नव्या दुर्गबांधणीसाठी महाराजांनी जिंजीजवळ असलेल्या मद्रास येथील इंग्रजांची मदत घेण्याचे ठरवले आणि तेव्हा इंग्रजांचे वास्तव्य मद्रास येथील सेंट जॉर्ज फोर्ट ( Saint George Fort ) मध्ये होते. त्यांना महाराजांनी ऐन मोहिमेत असताना एक पत्र लिहून त्यांची मदत मागितली दी. २२ सप्टेंबर , १६७७ रोजी शिवाजी महाराजांनी सर डब्लू एम ( विल्यम लाँगहॉर्न याला लिहिलेले पत्र ते असे -

डब्लू एम लाँगहॉर्न ह्यांस -
दी. २२ सप्टेंबर,१६७७

मी कर्नाटक प्रांतात आल्यापासून अनेक किल्ले जिंकले , कित्येक किल्ल्यांमधे मला नवीन बांधकामे करायची आहेत. मोठ्या तोफांचे ( लाकडी ) गाडे कसे करावे आणि सुरुंग कसे लावावेत हे जाणणारी माणसे तुमच्याकडे असतील तर आम्हाला अशा लोकांची आणि विशेष म्हणजे सुरुंग लावून दगडी भिंती उडविणाऱ्या कसबी लोकांची गरज आहे. गोव्यातून व वेंगुर्ल्यातून आलेले सर्व लोक इथे कामात गुंतलेले असताना जेव्हा त्यांच्याकडे आणखी माणसांबद्दल मी विचारणा केली तेव्हा ते सर्व चेनापट्टण व पुलीकतकडे गेल्याचे त्यांनी सांगितले . तेव्हा आपल्याकडील ज्या लोकांना सुरुंग लावण्याची माहिती आहे, असे लोक आम्हाला मिळू शकतील की नाही याबद्दल चौकशी करून असे लोक मिळत असल्यास २० ते २५ किंवा निदान १० ते ५ लोक तरी आम्हाला मिळवून द्यावेत. आम्ही त्यांना आमच्या ताब्यात असलेल्या निरनिराळ्या दुर्गांमध्ये उत्तम वेतन देऊन चाकरीवर ठेवू. तुम्ही तेवढी कृपा केल्यास आम्ही तुमचे आभारी राहू. आम्हाला असे लोक जितके पाठवता येईल तेवढे पाठवावे.

" Since my arrival into the Cornat country i have conquered several forts and castles , and also do intend to build new work in those several forts and castles. You may likely have with you such men as they know how to make great canons and guns and how to contrive mines. We need such men at present , especially those who know how to make mines and to blow up stone walls. I had such men with me , who came from Goa and Vengurla and are all kept employed in several of my forts and castles, and when i enquired for more such men to work upon the things , they told me that they have moved towards Chinapattam and Pullikat, therefore i now write to you about them that you may enquire if there are any such men with you who are ready to make mines, you would be pleased to send some 20 or 25 such men or 10 to 5 men , for i shall pay them very well . I will also acknowledge your worship and kindness towards us, so you enquire about those men and send them here as many as you can. { Translation Of A Letter From Sevagee Raja From Vancambado " to sir W M .Langhorne }

महाराजांनी इंग्रजांना पत्र लिहिलेले होते की सुरंग लावून जुनं बांधकाम उध्वस्त करणारी माणसांची मदत मिळावी म्हणून पण शिवाजी महाराजांकडे मद्रासकर इंग्रजांनी सुरंग खोदणारी माणसे पाठवली नाहीत. तरी सुद्दा महाराजांनी ही कामे स्थानिक लोकांकडून करून घेतली . दक्षिण दिग्विजयच्या वेळी त्यांचा दुर्गबांधणीचा आणि जुने दुर्ग आपल्या गरजेनुसार परत बांधून काढण्याचा किती मोठा उद्योग सुरू होता ते मागच्या पत्रात कळालेच असेल. महाराजांनी दक्षिण दिग्विजयच्या प्रसंगी साजरा व गोजरा या दोन गिरिदुर्गांची निर्मिती केली इतपत माहिती मिळते पण त्या वेळी असे अनेक किल्ले असणार जे महाराजांनी जिंकले , पाडून नवे बांधले. परंतु ते कोणते ह्याबद्दल पुरावे उपलब्ध नाहीत, किंवा आता उपलब्ध झाले ही असतील.

जिंजी किल्ल्याच्या जिर्णोद्धारासाठी शिवाजी राजांनी रुद्राजी साळवी याची इमारती हवालदार म्हणून नेमणूक केली , तीन बाले-किल्ल्यांच्या जिंजीच्या बांधकामाचा आराखडा फारच मोठा आहे. प्रत्येक बालेकिल्ल्याला भक्कम तटबंदीचा साज चढवायचा होता. पाहता पाहता जिंजी किल्ल्याचा कायापालट झाला. राजगिरीवर सदर , राजमंदिर , अंबारखाने , दारुकोठरे यांच्यासारखे वास्तू आकारात आलेले आहेत. श्रम , वेळ, पैसा काही थोडा म्हणून लागलाच नाहीये , पण महाराजांची जिद्द प्रचंड .जिंजीचा किल्ला बांधून झाला तो पाहून मद्रासकर इंग्रजांनीही कबूल केले की , जिंजीचे बांधकाम युरोपमधील एखाद्या बळकट किल्ल्यासारखेच.

जिंजीच्या शेजारी असलेल्या पॉंडीचेरीच्या फ्रेंच लोकांनीही जिंजीचा किल्ला पाहिला आणि त्यांचे गव्हर्नर फ्रांस्वाचा मारतने तर आपल्या रोजनिशीत लिहून ठेवले आहे की , " शिवाजी राजाने जिंजीचा जुना कोट पाडला , जिंजीभोवती खंदक खणले , नवीन तटबंदी बांधून त्यात आवश्यकतेनुसार भक्कम बुरुज बांधले. हे बांधकाम इतके मजबूत व सुंदर झाले आहे की ते स्थानिक लोकांनी न करता एखाद्या युरोपियन इंजिनियरने केल्यासारखे वाटते. शिवाजी महाराजांनी दुर्गबांधणी नामक कलेचे इतके सूक्ष्म ज्ञान होते की , निष्णात शिल्पज्ञ ओळखण्यास व त्याला दुर्गकार्यात कामावर योजण्यास त्यांना अडचण नव्हती.

ह्या बद्दल समकालीन युरोपियन इतिहासकरांनी लिहिलेले आहे की,
" He ( Shivaji) has studied with extreme care everything about the duty of general , soldier, about all the art of fortification which he understood better than the ablest engineers. " { Foreign Biographies Of Shivaji, By Dr. Surendranath Sen}
( सेनापती व सैन्य यांच्या कार्यांचा शिवाजी राजांनी अतिशय सूक्ष्म अभ्यास केलेला असून दुर्गांची पुनर्रचना करण्याची कला निष्णात स्थापत्य विशारदापेक्षाही त्यांना अधिक चांगली अवगत होती.

इंग्रज व फ्रेंच अधिकाऱ्यांनी जिंजीच्या किल्ल्याची मुक्तकंठाने स्तुती केली खरी ,पण त्याची खरीखुरी प्रचिती राजाराम महाराजांच्या काळात आली. त्या वेळी जिंजीचा किल्ला जिंकायला मोगलांच्या सेनासागराला एक नाही , दोन नाही तर सात वर्षे लागली.

भारतात मराठ्यांचा अंमल हा एका विश्वखंडा एवढा मोठा आहे कि त्याची इतिहासातील सारखी नोंदणी करावी असा ठसा उमटवून आलाय.

मनुजामाजी शिवरायापरी दूजा न नर जैसा,
दुर्गांचा अधिराज रायगड उभा सुभग तैसा..
Coronation Ceremony Of Raja Shiv Chatrapati , 6 June , 1674
(काळ , वेळ , परिस्थिती , युग , प्रजा आणि स्वतंत्र भारत)

राजा शिव छत्रपति जयते

Saturday, 23 May 2020

स्वराज्य रक्षक संभाजी

पुरंदरच्या किल्ल्यावर जन्म झाला नव्या इतिहासाचा,
आनंदाला पारावर उरला नाही स्वराज्यातील जनतेला!
महाराष्ट्राच्या मातीला आशीर्वाद लाभला आई- भवानीचा,
पुत्र हा सह्याद्रीचा , छावा शोभला शिवछत्रपतींचा!!

स्वराज्याचा भगवाही नव्या उमेदीने फडकू लागला,
येथील मातीलाही कस्तुरीचा सुगंध येऊ लागला!
पशु-पक्षी ,राने-वनेही आनंदाने डोलू लागली,
नद्या-नाले, सप्तसगरही शंभु शंभु म्हणू लागली!!

वयाच्या दुसऱ्या वर्षीच शंभुबाळाचं मातृछत्र हरवलं,
बालपणीच पोर आईच्या मायेला पोरकं झालं!
त्यानंतर आऊसाहेब आणि आबासाहेबांनीच सर्व सांभाळलं,
स्वराज्याच्या या छाव्यास धगधगत्या लाव्हाचं रूप दिलं!!

वयाच्या नवव्या वर्षीच या छव्यानं दिलेरखानास नमवलं,
मुघलांच्या आसमंताध्येही स्वराज्यप्रेम जागवलं!
दिल्लीत जाऊन आलमगीर औरंग्याची सुद्धा झोप उडविली,
अबसाहेबांच्या सुटकेसाठी पराक्रमाची शर्थ गाजविली!!

माँ जिजाऊनंतर शंभुबाळ अग्निदिव्यास समोरं गेलं,
जिजाऊनंतर ते "श्रीमान" रायगडासही पोरकं झालं!
आप्तेष्टांच्या कट-कारस्थानांनाही ते कधीही नाही डगमगले,
तर, स्वतःच्या स्वराज्यनिष्ठने पुन्हा एकदा उजळून निघाले!!

स्वराज्याचे शिवरूपी छत्र जेंव्हा मावळले,
आपले दुःख बाजूला ठेऊन त्यांनी रयतेला अपलेसे केले!
एकाच वेळी पाच शत्रूंशी दोन हात केले,
अखंड महाराष्ट्रात एकटेच मर्द मराठे शोभले!!

सलग नऊ वर्षे या छाव्याने स्वराज्याची सीमा विस्तारली, 
शिवबाच्या आरमारास विज्ञानाची जोड दिली!
अखेरपर्यंत शिवविचारांना मनात जागते ठेवले,
सर्व रयतेच्या मनात सवाईशिवराय शोभले!!

असा हा छावा शत्रूंसाठी आयुष्यभर कर्दनकाळ ठरला,
आबासाहेब आणि स्वराज्यासाठी त्यांनी मृत्यूही कवटाळला!

शंभुराज्यांचे बलिदान पाहून भीमा-इंद्रायणीमाईही अश्रु  ढाळू  लागली,
अशा थोर स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांची कहाणी इतिहासात अजरामर झाली!!

लेखन -संग्रामजित दिगंबर वराडे

Friday, 22 May 2020

शिवराज्य


छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हिंदवी स्वराज्य स्थापन केले. उत्तरेत मोगल ,दक्षिणेत विजापूरची आदिलशाही, भागानगर चा कुतूबशाह ,पोर्तुगीज, सिद्धी,इंग्रज यांच्या विरोधात संघर्ष करून स्वराज्याची बांधणी मजबूत केली. 1645 ते 1680 हा महाराजांचा राजकीय कालखंड होय.हा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा इतका सुंदर आहे. या ठिकाणी रयतेचे राज्य होते. येथील प्रत्येक माणसाला मीच छत्रपती आहे असे वाटून स्वराज्याच्या लढात्यात आपले रक्त त्यानी बलिदान केले. वयाच्या16 व्या वर्षी स्वराज्याचे  लावलेले झाड छत्रपतींनी त्यांची मूळे इतकी खोल रोवली केली.उत्तरेतून येणाऱ्या औरंगजेबाला ती उकरुन काढताआली नाहीत.1682ला छत्रपती च्या निधनानंतर स्वराज्य लगेच जिंकून घेता येईल या उदेशाने आलेल्या औरंगजेबास दक्षिणेत मराठयाशी 25 वषे प्रदीर्घ संघर्ष करावा लागला. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, मराठयांची भद्रकाली महाराणी ताराबाई यांच्या शी त्याने संघर्ष केला. छत्रपती संभाजी महाराजांचा संघर्ष तरी अंगावर काटा आणारा आहे. महाराजांच्या निधनानंतर1681ते 89हा इतिहास मराठी सत्तेचा असमितेचा आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी मोगल, सिद्धी,इंग्रज,पोर्तुगीज यांच्या शी लढून स्वराज्य राखले. धर्मवीर राज्या म्हणून छत्रपती संभाजी महाराजांना ओळखले जाते. मध्य युगीन भारताच्या इतिहासात धर्मासाठी आपले प्राण देणारा राजा म्हणून छत्रपती संभाजी महाराजांना ओळखले जाते.202 युद्धे लहान मोठेे त्यांनी जिंकले.छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर छ.शिवाजी महाराज आणि
 महाराणी सोयराबाई चे चिरंजीव छत्रपती राजाराम महाराज यांनी 1689 पासून ते1699पर्यंत स्वराज्य राखले.1689ला रायगड औरंगजेबाने जिंकल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे तामिळनाडू मधील जिंजी चा किल्ला जो किल्ला छ.शिवाजी महाराजांनी 1678 ला दक्षिण मोहिमेत जिंकून घेतला होता. तेथून1689 ते 1695 पर्यंत राजकारभार पाहिला.मराठयांची राजधानी जिंजी ही त्यांनी बनवली. मोगल सरदार झुलफिकारखान यांच्या विरोधात 10 वर्षे संघर्ष केला. त्यांनी वतनदारी व्यवस्था सुरू केली. 1695 ला छ.राजाराम महाराज स्वराज्यात परत आले.1695 ला सातारा ही राजधानी बनवून मराठी स्वातंत्र्य युध्दांचे नेतृत्व केले. त्याच्या निधनानंतर महाराणी ताराबाई यांनी 1699 ते 1707 पर्यंत औरंगजेबाच्या मूत्यू पर्यंत त्याला फक्त झुलवत ठेवले. ताराबाई नी नवीन युद्ध पध्दत सुरू केली. औरंगजेबाला किल्ला उन्हाळ्यात विंकत दयाचा आणि पावसाळ्यात तो पुन्हा जिंकून घ्यायचा.यातून स्वराज्याची अर्थव्यवस्था सावरली. राणीच्या पराक्रमाचे कौतुक समकालीन इतिहास कार खाफीखान याने तारीखे ई खाफीखान या ग्रंथात केले आहे.औरंगजेब सुध्दा कौतुक करतो.स्वराज्य वाढवण्यामध्ये शिलेदारांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. तानाजी, येसाजी, कंकाजी, कोंडाजी, बाजी, नेताजी, वीरशिवा, संताजी, धनाजी यासारखे शेकडो शिलेदारांनी पराक्रमाचे शौर्य गाजवले.
प्रा.विनोद जालिंदर निकम
(एम.ए.इतिहास, सेट,जीवनप्रबोधिनी कन्या
 महाविद्यालय ,विटा. जि. सांगली
मो.9146256525

(सदर लेखाचे अधिकार लेखकाचे राहतील हा लेख जास्त लोकांपर्यंत पोहचावा ह्या हेतूने स्वराज्य माझ्या राजांच वेबपोर्टल वर Post केला आहे त्यावर वेबपोर्टल चा अधिकार नाही. )
-----------------------------------------

स्वराज्य माझ्या राजांच Android App येथून 👉Download करा

शिवसह्याद्री  Android App येथून
👉Download करा

स्वराज्य माझ्या राजांच फेसबुक पेज येथून 👉 Like करा


Thursday, 21 May 2020

इतिहास तळोदयाचा

तळोदा येथील बारगळ गढी हि 360 वर्ष जूनी आहे हिचे बांधकाम भोजराज बारगळ यांनी 1662 साली लावले होते हे काम एकूण 7 वर्ष चालले होते या गढिचा 8 फुट खोल बीम आहे गढीचे बांधकाम एकूण 6 एकर जागेत पसरले आहे हि गढी तापी नदिपासुन 3.5 किलोमीटर व सातपुडाच्या पायथ्याशी आहे गढ़ीचे कारागीर हे राजस्थान हुन बोलावले होते,राजस्थानी व मराठा शैलीत गढिचे काम झाले आहे,आजुबाजूच्या 7 गावांना येथे वस्तीसाठी आणले होते,तळोदा हे 16व्या शतकात एक खेड गाव होत,बारगळ हे मुळ नगर जिल्ह्यातले होते प्रथम शिवाजीराव बारगळ येथे आले प्रथम ते सुल्तानपुर येथे थांबले सुल्तानपुर हे 800 वर्षापासून तालुका व परगणा होते नंतर ते तळोदा येथे आले इथे सातपुडयाच्या रांगेत वसलेल्या अक्राणी येथील गडमुंजा संस्थानचे राजपूत राजे यांच्या सेवेत ते रुजू झाले राज्याच्या सिमेचे रक्षण करण्यासाठी बारगळ यांना तळोदा येथे गढी बांधून देण्यात आली या गढिचा अजुन एक उज्वल इतिहास म्हणजे भोजराज बारगळ हे सुभेदार मल्हारराव होळकर यांचे सख्हे मामा मल्हाररावांचे वडील लहानपनीच गेल्याने भोजराज यांनी बहिनीचा व भाच्याचा सांभाळ केला.मल्हाररावांचे संपूर्ण बालपन याच गढ़ीत गेले पुढे त्यांना भोजराज यांनी 25 घोडयांचे शिलेदारी पथक तयार करून तोरखेडचे सरदार कदमबांडे यांच्या मनसबदारीत रुजू केले व तिथेच पेशव्यांनी त्यांचा पराक्रम पाहुन त्यांना आपल्याकड़े मागून घेतले मल्हाररावांना भोजराज बारगळ यांनी आपली कन्या दिली व याच गढित त्यांचे लग्न लावले,पुढे नारायणराव भोजराज बारगळ हे राजपुताना येथील राजा संग्रामसिंह व देवसिंह यांच्या सेवेत रुजू झाले तिथे त्यांना बूढा परगणा जहागीरीत भेटली त्याचे त्यांनी दोन भाग केले एक मल्हाररावांना दिले त्याचे नाव मल्हारगड व एक स्वतकडे ठेवले त्याचे नाव नारायणगड ..
तळोदा हे कसबे गाव तसे तळोदयाचे सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्व हि मोठे आहे या गढीला गोंदवलकर गुरुजी व स्वातंत्र्यवीर सावरकर हे हि येऊन गेले आहेत सध्या या गढीत बारगळांचे 9 वे वंशज श्रीमंत अमरजीतराव बारगळ हे असतात तसेच हृषिकेश बारगळ हे त्यांचे भाऊबंद हि असतात अमरजीत बारगळ हे मराठा साम्राज्यातिल सर्व संस्थानीक यांची जी राजघराणे संघटना आहे जिचे अध्यक्ष तंजावरचे भोसले आहेत तीचे उपाध्यक्ष अमरतजीत बारगळ हे आहेत व पेशव्यांचे वंशज हे कार्यध्यक्ष आहेत..
असा हा तळोदयाचा व बारगळ गढीचा इतिहास..

खाली बारगळ गढीतील फोटो , सावरकरांनी बारगळ जहागीरदार यांना भेट म्हणून दिलेली त्यांची टोपी.

माहिती लेखण
©️-प्रसाद पाठक ,
संपर्क : 9420372982
पत्ता: 139,दामोदर नगर ,शहादा रोड, तळोदा जि,नंदुरबार

(सदर लेखाचे अधिकार लेखकाचे राहतील त्यावर हा लेख जास्त लोकांपर्यंत पोहचावा ह्या हेतूने स्वराज्य माझ्या राजांच वेबपोर्टल वर Post केला आहे त्यावर वेबपोर्टल चा अधिकार नाही. )
-----------------------------------------

स्वराज्य माझ्या राजांच Android App येथून 👉Download करा

शिवसह्याद्री  Android App येथून
👉Download करा

स्वराज्य माझ्या राजांच फेसबुक पेज येथून 👉 Like करा


Wednesday, 20 May 2020

महाराणी येसूबाई साहेब

तप्त अग्नी कल्लोळ जाहला
उसळली शौर्याची ही लाट
गणिमांना धुळीस मिळवून शोभे
स्वराज्याच्या युवराज युवराज्ञीचा मान

संभाजी महाराजांच्या आयुष्यातील सर्वात जवळच व प्रेमाचं स्थान लाभलेलं व्यक्तिमत्व म्हणजे महाराणी येसूबाई साहेब संभाजी महाराजांच्या अर्धांगिनी.

थोरल्या महाराज साहेबानी शृंगारपूरच्या पिलाजीराव शिर्केची कन्या राजाऊ भोसल्यांची येसूबाई म्हणून सून करवून घेतली. येसूबाई शंभुराजेंपेक्षा दीड दोन वर्षांनी लहान होत्या पण भोसल्यांची सून म्हणून जबाबदऱ्यांचं भान त्यांनी वेळीच जाणलं होत.

मुख्यतः शंभूराजे एक वादळ होते व ते वादळ थांमवण्यासाठी थोरल्या महाराज्यानी आणि आऊसाहेबांनि त्यांचा विवाह येसूबाईंशी करून दिला. संकटांशी सवय करण व योग्य वेळी मात करणं हे शंभुराज्यांप्रमाणे येसूबाईंनाही अवगत होत म्हणूनच शंभुराजेंसारखा रणधुरंधार पराक्रमी राजा घडवण्यात जेवढं श्रेय छत्रपती शिवाजी महाराज थोरल्या आऊसाहेब आणि इतर थोरा मोठ्यांच आहे तितकाच किंबहुना त्या पेक्षा जास्त श्रेय श्री सखी राज्ञी अर्थात येसूबाईसाहेबांचं आहे.


एकदा खुद्द शंभूराजे येसूबाईंना म्हणले होते ,येसू या दौलतीत आम्ही फक्त ३ आसामीवर यकीन करतो पाहिले म्हणजे आमचे आबासाहेब ,दुसरी असामी म्हणजे  आऊसाहेब ज्यांच्या आधारावर आम्ही तगलो आहोत आणि तिसरी म्हणजे आमच्या धर्मपत्नी येसूबाई आमच्या सुखदुःखाची साथीदारीन!


शंभूराजे आणि येसूबाई यांचे संबंध खूप चांगले होते.  दोघांचा एकमेकांवर पूर्ण विश्वास होता. येसूबाईंचा शंभुराजेंच्या प्रत्येक निर्णयात समावेश होता. म्हणूनच शंभुराजेंनी स्वतः येसूबाईंना 'श्री सखी राज्ञी जयती' अशी उपाधी दिली. त्या कधीही कोणत्याही प्रसंगात डगमगल्या नाहीत. मासाहेबांनी राजकारणाचे धडे जसे शंभुराजेंना दिले तसेच नीतिमत्ता सांसारिक आणि राजकारणाचे धडे येसूबाईंनाही दिले. त्याच्या कर्तव्यदक्ष स्नेहमय सर्वसमावेशक व्यक्तिमत्वाने एक वेगळीच उंची गाठली होती. म्हणूनच उंच उभट चेहऱ्याच्या, देखण्या नाकसरीच्या, झुपकेदार नथ घातलेल्या, चवळीच्या शेंगेसारख्या सडपातळ बांध्याच्या, तरुण, उत्साही येसूबाई राजगडावरच्या राणीवश्यात एक आकर्षण बिंदू ठरल्या होत्या.  रायगडावर शंभुराजेंच्या सोयराबाई सह एकूण ६ मातोश्री राहत होत्या. पण येसूबाईंसारखा असा चमकदारपणा व आदर इतर कोणत्याच व्यक्तिमत्त्वाला लाभला नाही.


शंभुराजेंसारख्या रोखठोक स्वभावाच्या, अन्याय अत्याचाराने सहज कापरासारख्या पेटणाऱ्या, हळव्या, तितकाच कठोर, शीघ्रकोपी नवऱ्याला सावरणाऱ्या अश्या येसूबाई होत्या!


भोसलेंची सून ती अर्धांगिनी ती शंभुची
प्रेमवत्सल्य ऐसें ते जणू ती सावली सईची
अवघी पंचक्रोशी श्री सखी म्हणती ऐसी कीर्ती शोभे येसूबाईंची

सर्वांचा मान अपमान सहन करून त्यांनी त्यांची एक वेगळीच उंची गाठली होती. महाराणी येसूबाई साहेबांच्या आयुष्यात जेवढी संकटे आली तेवढी राजघरण्याती ल कोणत्याही स्त्री वर आली नसावीत. एवढे सर्व राजवैभव असूनही दुर्दैव त्यांच्या पाठीशी लागले आणि सुमारे 30 वर्ष मराठ्यांच्या या महाराणीला शत्रूच्या बंदिवासात जीवन कंठावे लागले. पण येसूबाईंनि ज्या धैर्याने आणि कणखर वृत्तीने त्या खडतर जीवनाला तोंड दिले त्याला इतिहासात तोड  नाही.


महाराणींनी किती दुःख झेलले असेल याची कल्पनाच करता येत नाही . छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाने फितुरीने कैद केले तेव्हा औरंगजेबाला वाटले की येसूबाई घाबरतील आपल्या कुंकवासाठी त्या स्वराज्य आपल्या हाती देतील . पण शंभुराजेंच्या आदेशानुसार महाराणींनी स्वराज्य राखले . तेव्हा खरी कसोटीची वेळ होती . दुसरा छत्रपती म्हणून कोणाला सिंहासनावर बसवायचं हा मोठा पेच होता . सर्वाना वाटत होतं की त्या त्यांच्या पुत्राला बसवत पण त्यांनी विचार करून पुत्रप्रेम बाजूला ठेवून दिराला म्हणजेच राजारामराजेंना गादीवर बसवले 


दररोज शंभुराजेंच्या केल्या जाणाऱ्या छळाबद्दल वाईट खबर येत होत्या.  पण त्या डळमळल्या नाही त्यांनी त्याच करकरीत मराठी बाण्याने औरंगजेबाला उत्तर दिले होते. इतकेच नाही तर रायगडाला वेढा पडला असताना त्यांनी स्वतःची किंवा स्वतःच्या मुलाच्या जीवाची पर्वा न करता राजाराम राजे आणि ताराबाईंना रायगडावरून सुरक्षित जिंजीला हलवले . तेव्हा त्या ही गेल्या असत्या, पण त्यांनी विचार केला आपण रायगड सोडला तर आधीच फितुरी करणारे सावध आहेत आणि औरंजेबाला रायगडावरून गेल्याची खबर मिळली तर संपूर्ण कुटुंब त्याच्या हाती लागेल ; त्यामुळे त्यांनी इथेही त्याग केला . पण काही दिवसात खबर आली की छत्रपती संभाजी महाराज यांची निर्घृण हत्या झाली . तो दिवस होता ११ मार्च १६८९ फाल्गुनी अमावस्या दुसऱ्या दिवशी नव वर्ष्याची गुडी उभारायची तर आधीच ही अशी खबर समजली . येसूबाईंची कर्तुत्वाला आणि त्यागाला खरी सुरवात झाली ती इथूनच !


सर्वाना वाटलं आता महाराणी खचतील . पण नाही त्याही शंभुराजेंच्या अर्धांगिनी होत्या . यावेळी जे त्या दुःख करत बसल्या असत्या तर रयतेचा धिरही सुटला असता आणि महाराष्ट्राचा मुख्यतः स्वराज्याचा इतिहास काही वेगळाच झाला असता . त्यांनी संयमाने घेतलं समोर रायगडाला पडलेला वेढा मोडण्यासाठी त्या प्रयत्न करत होत्या . महाराज्याची हत्या करणाऱ्या औरंगजेबाला आता स्वस्थ बसू द्यायचं नाही अशी जणू त्यांनी शपथच घेतली होती ! त्यांनी खूप वेळा वेढा फोडायचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला . शेवटी रायगड मुघलांच्या ताब्यात गेला महाराणी येसूबाई राजमाता सकवार मातोश्री आणि शाहूराजे राजकैदी म्हणून कैद झाले . महारानींची झालेली कैद सुमारे २९ वर्ष्याची होती!


 महाराणी मुघलांच्या कैदेत इतकी वर्षे होत्या . मुळात हीच गोष्ट खूप काही सांगून जाते प्रत्येकाला औरंगजेब कसा होता हे माहीतच आहे ते काही वेगळं सांगायची गरज नाही . कारण त्याची क्रूरता आठवली तर शंभुराजेंच्या यातना आठवतात  त्या यातना आठवल्या तर बाकीचे विचार बंद होतात आणि मन नकळत शौर्यपीठ तुळापूर येथे जात अश्या औरंगजेबाच्या छावणीत राहणं काही सोपी गोष्ट नाही .


१६९० ते १७१९  या कालावधीत त्या कैदेत होत्या . आजूबाजूला परधर्मीय पुरुष , सगळं वातावरण वेगळं , रीतिरिवाज , पोशाख सगळं सगळं वेगळं . मुस्लिम धर्म स्वीकारावा म्हणून शंभुराजेंच्या अमानुष हत्या करणारा औरंगजेब येसूबाईंशी कसा वागलं असेल? याची कल्पना ही करवत नाही जिथे छावणीचा तळ पडेल तिथे त्या मायलेकरची फरफट होई . स्वराज्यात राहूनही स्वतंत्र उपभोगणे त्यांच्या नशिबात नव्हते असच म्हणावे लागेल .

धर्मांतर आणि अब्रूच्या भीतीत त्या कश्या राहिल्या असतील ? इतक्या वर्ष्यात त्यांचं मानसिक संतुलन ढळले नसेल का ?

 त्यांची कैद झाल्यावर त्यांचे काय हाल झाले याबद्दल कुठे ही माहिती नाही पण विचार केला तरी वाईट वाटलं . स्वराज्यासाठी महाराणी राजमाता येसूबाईंनी केलेल्या आयुष्यभराचा त्याग ही त्यागाची उच्च सीमा म्हणता येईल ! खरंच त्यांच्या त्यागाचा आणि बलिदानाचा इतिहास सर्वाना समजावा सर्वांपर्यंत लवकरात लवकर पोहोचावा  हीच इच्छा !


अश्या अखल सौभाग्य श्री लक्ष्मी अलंकृत श्री सखी राज्ञी जयती असणाऱ्या महाराणी येसूबाईसाहेबांची समाधी श्री क्षेत्र माहुली संगम येथे आहे व धर्मासाठी आपल्या जीवाची ही पर्वा न  करणाऱ्या छत्रपती श्री संभाजी महाराज यांची समाधी वढू-तुळापूर येथे आहे.


मृत्यूचे आव्हान पेलूनी तोच वारसा आम्हाला दिला
शिवरायांचा शंभू छावा हिंदू म्हणून अमर जाहला


✍️लेखन :सुचेता ताई भिसे
संपर्क : ८८०५७८७६५२
(सदर लेखाचे अधिकार लेखकाचे राहतील त्यावर हा लेख जास्त लोकांपर्यंत पोहचावा ह्या हेतूने स्वराज्य माझ्या राजांच वेबपोर्टल वर Post केला आहे त्यावर वेबपोर्टल चा अधिकार नाही. )
-----------------------------------------

स्वराज्य माझ्या राजांच Android App येथून 👉Download करा

शिवसह्याद्री  Android App येथून
👉Download करा

स्वराज्य माझ्या राजांच फेसबुक पेज येथून 👉 Like करा



श्रीशिवराज्याभिषेक

रायगड सजले , भारतात समाज शासनबद्ध झाला आणि मराठ्यांच्या राज्यकारभारात नवे पर्व सुरू झाले- राजधानी रायरीवर शिवाजी महाराजांचा राज्...