तप्त अग्नी कल्लोळ जाहला
उसळली शौर्याची ही लाट
गणिमांना धुळीस मिळवून शोभे
स्वराज्याच्या युवराज युवराज्ञीचा मान
संभाजी महाराजांच्या आयुष्यातील सर्वात जवळच व प्रेमाचं स्थान लाभलेलं व्यक्तिमत्व म्हणजे महाराणी येसूबाई साहेब संभाजी महाराजांच्या अर्धांगिनी.
थोरल्या महाराज साहेबानी शृंगारपूरच्या पिलाजीराव शिर्केची कन्या राजाऊ भोसल्यांची येसूबाई म्हणून सून करवून घेतली. येसूबाई शंभुराजेंपेक्षा दीड दोन वर्षांनी लहान होत्या पण भोसल्यांची सून म्हणून जबाबदऱ्यांचं भान त्यांनी वेळीच जाणलं होत.
मुख्यतः शंभूराजे एक वादळ होते व ते वादळ थांमवण्यासाठी थोरल्या महाराज्यानी आणि आऊसाहेबांनि त्यांचा विवाह येसूबाईंशी करून दिला. संकटांशी सवय करण व योग्य वेळी मात करणं हे शंभुराज्यांप्रमाणे येसूबाईंनाही अवगत होत म्हणूनच शंभुराजेंसारखा रणधुरंधार पराक्रमी राजा घडवण्यात जेवढं श्रेय छत्रपती शिवाजी महाराज थोरल्या आऊसाहेब आणि इतर थोरा मोठ्यांच आहे तितकाच किंबहुना त्या पेक्षा जास्त श्रेय श्री सखी राज्ञी अर्थात येसूबाईसाहेबांचं आहे.
एकदा खुद्द शंभूराजे येसूबाईंना म्हणले होते ,येसू या दौलतीत आम्ही फक्त ३ आसामीवर यकीन करतो पाहिले म्हणजे आमचे आबासाहेब ,दुसरी असामी म्हणजे आऊसाहेब ज्यांच्या आधारावर आम्ही तगलो आहोत आणि तिसरी म्हणजे आमच्या धर्मपत्नी येसूबाई आमच्या सुखदुःखाची साथीदारीन!
शंभूराजे आणि येसूबाई यांचे संबंध खूप चांगले होते. दोघांचा एकमेकांवर पूर्ण विश्वास होता. येसूबाईंचा शंभुराजेंच्या प्रत्येक निर्णयात समावेश होता. म्हणूनच शंभुराजेंनी स्वतः येसूबाईंना 'श्री सखी राज्ञी जयती' अशी उपाधी दिली. त्या कधीही कोणत्याही प्रसंगात डगमगल्या नाहीत. मासाहेबांनी राजकारणाचे धडे जसे शंभुराजेंना दिले तसेच नीतिमत्ता सांसारिक आणि राजकारणाचे धडे येसूबाईंनाही दिले. त्याच्या कर्तव्यदक्ष स्नेहमय सर्वसमावेशक व्यक्तिमत्वाने एक वेगळीच उंची गाठली होती. म्हणूनच उंच उभट चेहऱ्याच्या, देखण्या नाकसरीच्या, झुपकेदार नथ घातलेल्या, चवळीच्या शेंगेसारख्या सडपातळ बांध्याच्या, तरुण, उत्साही येसूबाई राजगडावरच्या राणीवश्यात एक आकर्षण बिंदू ठरल्या होत्या. रायगडावर शंभुराजेंच्या सोयराबाई सह एकूण ६ मातोश्री राहत होत्या. पण येसूबाईंसारखा असा चमकदारपणा व आदर इतर कोणत्याच व्यक्तिमत्त्वाला लाभला नाही.
शंभुराजेंसारख्या रोखठोक स्वभावाच्या, अन्याय अत्याचाराने सहज कापरासारख्या पेटणाऱ्या, हळव्या, तितकाच कठोर, शीघ्रकोपी नवऱ्याला सावरणाऱ्या अश्या येसूबाई होत्या!
भोसलेंची सून ती अर्धांगिनी ती शंभुची
प्रेमवत्सल्य ऐसें ते जणू ती सावली सईची
अवघी पंचक्रोशी श्री सखी म्हणती ऐसी कीर्ती शोभे येसूबाईंची
सर्वांचा मान अपमान सहन करून त्यांनी त्यांची एक वेगळीच उंची गाठली होती. महाराणी येसूबाई साहेबांच्या आयुष्यात जेवढी संकटे आली तेवढी राजघरण्याती ल कोणत्याही स्त्री वर आली नसावीत. एवढे सर्व राजवैभव असूनही दुर्दैव त्यांच्या पाठीशी लागले आणि सुमारे 30 वर्ष मराठ्यांच्या या महाराणीला शत्रूच्या बंदिवासात जीवन कंठावे लागले. पण येसूबाईंनि ज्या धैर्याने आणि कणखर वृत्तीने त्या खडतर जीवनाला तोंड दिले त्याला इतिहासात तोड नाही.
महाराणींनी किती दुःख झेलले असेल याची कल्पनाच करता येत नाही . छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाने फितुरीने कैद केले तेव्हा औरंगजेबाला वाटले की येसूबाई घाबरतील आपल्या कुंकवासाठी त्या स्वराज्य आपल्या हाती देतील . पण शंभुराजेंच्या आदेशानुसार महाराणींनी स्वराज्य राखले . तेव्हा खरी कसोटीची वेळ होती . दुसरा छत्रपती म्हणून कोणाला सिंहासनावर बसवायचं हा मोठा पेच होता . सर्वाना वाटत होतं की त्या त्यांच्या पुत्राला बसवत पण त्यांनी विचार करून पुत्रप्रेम बाजूला ठेवून दिराला म्हणजेच राजारामराजेंना गादीवर बसवले
दररोज शंभुराजेंच्या केल्या जाणाऱ्या छळाबद्दल वाईट खबर येत होत्या. पण त्या डळमळल्या नाही त्यांनी त्याच करकरीत मराठी बाण्याने औरंगजेबाला उत्तर दिले होते. इतकेच नाही तर रायगडाला वेढा पडला असताना त्यांनी स्वतःची किंवा स्वतःच्या मुलाच्या जीवाची पर्वा न करता राजाराम राजे आणि ताराबाईंना रायगडावरून सुरक्षित जिंजीला हलवले . तेव्हा त्या ही गेल्या असत्या, पण त्यांनी विचार केला आपण रायगड सोडला तर आधीच फितुरी करणारे सावध आहेत आणि औरंजेबाला रायगडावरून गेल्याची खबर मिळली तर संपूर्ण कुटुंब त्याच्या हाती लागेल ; त्यामुळे त्यांनी इथेही त्याग केला . पण काही दिवसात खबर आली की छत्रपती संभाजी महाराज यांची निर्घृण हत्या झाली . तो दिवस होता ११ मार्च १६८९ फाल्गुनी अमावस्या दुसऱ्या दिवशी नव वर्ष्याची गुडी उभारायची तर आधीच ही अशी खबर समजली . येसूबाईंची कर्तुत्वाला आणि त्यागाला खरी सुरवात झाली ती इथूनच !
सर्वाना वाटलं आता महाराणी खचतील . पण नाही त्याही शंभुराजेंच्या अर्धांगिनी होत्या . यावेळी जे त्या दुःख करत बसल्या असत्या तर रयतेचा धिरही सुटला असता आणि महाराष्ट्राचा मुख्यतः स्वराज्याचा इतिहास काही वेगळाच झाला असता . त्यांनी संयमाने घेतलं समोर रायगडाला पडलेला वेढा मोडण्यासाठी त्या प्रयत्न करत होत्या . महाराज्याची हत्या करणाऱ्या औरंगजेबाला आता स्वस्थ बसू द्यायचं नाही अशी जणू त्यांनी शपथच घेतली होती ! त्यांनी खूप वेळा वेढा फोडायचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला . शेवटी रायगड मुघलांच्या ताब्यात गेला महाराणी येसूबाई राजमाता सकवार मातोश्री आणि शाहूराजे राजकैदी म्हणून कैद झाले . महारानींची झालेली कैद सुमारे २९ वर्ष्याची होती!
महाराणी मुघलांच्या कैदेत इतकी वर्षे होत्या . मुळात हीच गोष्ट खूप काही सांगून जाते प्रत्येकाला औरंगजेब कसा होता हे माहीतच आहे ते काही वेगळं सांगायची गरज नाही . कारण त्याची क्रूरता आठवली तर शंभुराजेंच्या यातना आठवतात त्या यातना आठवल्या तर बाकीचे विचार बंद होतात आणि मन नकळत शौर्यपीठ तुळापूर येथे जात अश्या औरंगजेबाच्या छावणीत राहणं काही सोपी गोष्ट नाही .
१६९० ते १७१९ या कालावधीत त्या कैदेत होत्या . आजूबाजूला परधर्मीय पुरुष , सगळं वातावरण वेगळं , रीतिरिवाज , पोशाख सगळं सगळं वेगळं . मुस्लिम धर्म स्वीकारावा म्हणून शंभुराजेंच्या अमानुष हत्या करणारा औरंगजेब येसूबाईंशी कसा वागलं असेल? याची कल्पना ही करवत नाही जिथे छावणीचा तळ पडेल तिथे त्या मायलेकरची फरफट होई . स्वराज्यात राहूनही स्वतंत्र उपभोगणे त्यांच्या नशिबात नव्हते असच म्हणावे लागेल .
धर्मांतर आणि अब्रूच्या भीतीत त्या कश्या राहिल्या असतील ? इतक्या वर्ष्यात त्यांचं मानसिक संतुलन ढळले नसेल का ?
त्यांची कैद झाल्यावर त्यांचे काय हाल झाले याबद्दल कुठे ही माहिती नाही पण विचार केला तरी वाईट वाटलं . स्वराज्यासाठी महाराणी राजमाता येसूबाईंनी केलेल्या आयुष्यभराचा त्याग ही त्यागाची उच्च सीमा म्हणता येईल ! खरंच त्यांच्या त्यागाचा आणि बलिदानाचा इतिहास सर्वाना समजावा सर्वांपर्यंत लवकरात लवकर पोहोचावा हीच इच्छा !
अश्या अखल सौभाग्य श्री लक्ष्मी अलंकृत श्री सखी राज्ञी जयती असणाऱ्या महाराणी येसूबाईसाहेबांची समाधी श्री क्षेत्र माहुली संगम येथे आहे व धर्मासाठी आपल्या जीवाची ही पर्वा न करणाऱ्या छत्रपती श्री संभाजी महाराज यांची समाधी वढू-तुळापूर येथे आहे.
मृत्यूचे आव्हान पेलूनी तोच वारसा आम्हाला दिला
शिवरायांचा शंभू छावा हिंदू म्हणून अमर जाहला
✍️लेखन :सुचेता ताई भिसे
संपर्क : ८८०५७८७६५२
(सदर लेखाचे अधिकार लेखकाचे राहतील त्यावर हा लेख जास्त लोकांपर्यंत पोहचावा ह्या हेतूने स्वराज्य माझ्या राजांच वेबपोर्टल वर Post केला आहे त्यावर वेबपोर्टल चा अधिकार नाही. )
-----------------------------------------
स्वराज्य माझ्या राजांच Android App येथून 👉Download करा
शिवसह्याद्री Android App येथून
स्वराज्य माझ्या राजांच फेसबुक पेज येथून 👉 Like करा